...अखेर कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे, उद्यापासून लिलाव होणार, भारती पवार यांच्या बैठकीनंतर संघटनेचा निर्णय
By संदीप भालेराव | Published: August 23, 2023 04:39 PM2023-08-23T16:39:42+5:302023-08-23T16:41:03+5:30
Nashik: कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून, गुरुवारपासून (दि. २५) कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
- संदीप भालेराव
नाशिक - कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून, गुरुवारपासून (दि. २५) कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
कांद्याच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले असून, व्यापारी, शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली होती. या बैठकीत कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी भूमिका मांडली. केंद्र सरकारने पूर्वसूचना न देता अचानकपणे ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याबाबत संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या निर्णयामुळे बंदरात सुमारे २०० निर्यात कंटेनर अडकून पडले असून, शुल्क आकारणीमुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. नाफेडचे अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया बंद असल्याने जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत सुरू व्हावेत यासाठी आपला प्रयत्न असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितले. कांदा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण सकारात्मक निर्णय होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी कांदा व्यापाऱ्यांना दिले.