...अखेर धडाडल्या ‘वज्र’ अन् ‘होवित्सर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:26 AM2018-11-11T01:26:31+5:302018-11-11T01:26:58+5:30
डोंगराळ प्रदेश असो किंवा वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेश अशा कोणत्याही भागातील भारताच्या सीमा अन् नियंत्रण रेषांच्या चोख संरक्षणासाठी सैन्यदलाच्या तोफा नेहमीच सज्ज असतात. शत्रूच्या संशयास्पद हालचालींना दमदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवणाऱ्या अत्याधुनिक विदेशी बनावटीच्या के-९ वज्र अन् होवित्सर एम-७७७ या तोफा देवळाली तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावर शुक्रवारी (दि.९) धडाडल्या.
नाशिक : डोंगराळ प्रदेश असो किंवा वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेश अशा कोणत्याही भागातील भारताच्या सीमा अन् नियंत्रण रेषांच्या चोख संरक्षणासाठी सैन्यदलाच्या तोफा नेहमीच सज्ज असतात. शत्रूच्या संशयास्पद हालचालींना दमदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवणाऱ्या अत्याधुनिक विदेशी बनावटीच्या के-९ वज्र अन् होवित्सर एम-७७७ या तोफा देवळाली तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावर शुक्रवारी (दि.९) धडाडल्या.
भारतीय सैन्याच्या ताफ्यात या तोफांच्या दमदार आगमनाने शत्रू राष्टचे धाबे दणाणले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचि देही याचि डोळा तोफखान्याचे शक्तिप्रदर्शन यावेळी अनुभवले. भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाºया तोफखान्याच्या भात्यात दोन नव्या अत्याधुनिक तोफांची मागील तीस वर्षांच्या कालखंडानंतर भर पडली. या तोफांच्या आगमनाचा आनंद तोफखाना केंद्रात झालेल्या हस्तांतरण सोहळ्यात जवानांच्या चेहºयांवर सहजरीत्या पहावयास मिळाला.
भारतीय संरक्षण दलाकडून ‘बोफोर्स’नंतर पहिल्यांदाच विदेशी बनावटीच्या दोन तोफांची खरेदी करण्यात आली. निर्मला सीतारामन, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राज्याचे संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या तोफा भारतीय तोफखाना केंद्राला देवळाली गोळीबार मैदानावर सोपविण्यात आल्या. यावेळी जवानांच्या समूहाने तोफांचा ताबा घेत ‘भारत माता की जय...’ अशा घोषणा दिल्या. जवानांचा उत्साह अन् आत्मविश्वासाने लक्ष वेधून घेतले.
‘बोफोर्स’ला पर्याय; तोफखान्याची वाढली ताकद
तोफखाना केंद्रातील बोफोर्स, सॉल्टम, १३० एमएम, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर या तोफांसह नव्याने दाखल झालेल्या वज्र आणि होवित्सर या तोफांचे ही प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. या दोन नव्या तोफांमुळे भारतीय तोफखान्याची ताकद कितीतरी पटीने वाढल्याचे यावेळी प्रात्यक्षिकांमधून दिसून आले. सुमारे २४ किमीपर्यंत मारा करण्याची तसेच ३६० अंशांत गोलाकार फिरण्याची क्षमता बोफोर्स ठेवते. होवित्सर ३१ किमी तर ‘वज्र’मध्ये ३८ किमीपर्यंत गोलाकार फि रून चौफेर बॉम्बहल्ला करण्याची क्षमता आहे.
वज्र अन् होवित्सरचा बॉम्बहल्ला
गोळीबार मैदानावर प्रात्यक्षिकादरम्यान तोफखान्यात नव्याने दाखल झालेल्या वज्र या अत्याधुनिक तोफेने ‘डायमंड’ लक्ष्य अवघ्या नऊ सेकंदातच अचूकरीत्या भेदले. हवालदार कौशलकुमार यांच्या नेतृत्वाखाली तोफखान्याच्या जवानांनी तीन बॉम्ब डागले. तसेच हॉवित्सरने
१५ सेकंदांत चार बॉम्ब ‘रिक्टॅन्गल’ लक्ष्यावर टाकून उपस्थितांना क्षमता दाखवून दिली. हवालदार बलविंदरसिंग यांनी नेतृत्व केले.
अशी आहे होवित्सर एम-७७७
होवित्सर ही वजनाने हलकी असलेली तोफ अमेरिकन बनावटीची आहे. भारताने ती सुमारे ७०० मिलियन डॉलर खर्च करून खरेदी केली आहे. अत्याधुनिक बनावटीच्या या तोफेचा मारा करण्याची क्षमता ३१ किलोमीटर अंतरापर्यंत आहे. तोफेचे वजन सुमारे ४ हजार ४३७ किलोग्रॅम इतके आहे. १५५ एमएम/३९ कॅलिबर होवित्सरचे आहे. सरासरी दोन मिनिटामध्ये चार राउण्ड बॉम्बगोळे डागण्याची क्षमता तोफेत आहे.
अशी आहे वज्र १५५-एमएम
वज्र ही बोफोर्स तोफेला सक्षम असा दुसरा पर्याय भारतीय सैन्यदलाकडे उपलब्ध झाला आहे. या तोफेची मारक क्षमता सुमारे
३८ किलोमीटरपर्यंत आहे. अवघ्या तीस सेकंदात तीन, तर तीन मिनिटांत पंधरा बॉम्बगोळे वज्र शत्रूच्या दिशेने डागू शकते. ही तोफ ३६० अंशामध्ये वर्तुळाकार फिरत चौफेर बॉम्ब हल्ला करू शकते. भारताने ही तोफ दक्षिण कोरियाकडून खरेदी केली आहे. भारताच्या संरक्षण खात्याने अशा दहा तोफा आणल्या असून, ९० तोफा निर्मितीच्या मार्गावर आहेत.
भारतीय सैन्यदलाच्या आधुनिकतेला आमच्या सरकारने मागील चार वर्षांमध्ये अधिकाधिक गती देण्याचा प्रयत्न केला आहे. २००६-०७ सालापासून मंदावलेल्या होवित्सर एम-७७७ आणि वज्र तोफा खरेदीची प्रक्रिया या सरकारच्या काळात पूर्णत्वास आली. तीस वर्षांनंतर सैन्यदलाला या दोन तोफा देण्यास आमचे सरकार यशस्वी झाले, याचा आम्हाला गर्व आहे. देशाचे संरक्षण खाते जलद गतीने प्रगती करत असून, सैन्यालाही आधुनिकतेच्या वाटेवर गतिमान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- निर्मला सीतारामन, केंद्रीय संरक्षणमंत्री
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सैन्यदलाला या आधुनिक दोन तोफा मिळाल्या आहेत. भारतीय भूदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी तोफखाना केंद्राकडून या तोफांचा वापर भविष्यात केला जाईल. या तोफांमुळे भारतीय सेनेच्या युद्धाच्या शैलीमध्ये चांगला बदल घडून येणार आहे. भविष्यातही सेनेच्या आधुनिकीकरणासाठी अन्य शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात आहे. येणाºया नवीन वर्षात ‘धनुष्य’ ही तोफदेखील तोफखान्याच्या ताफ्यात आलेली बघावयास मिळेल याची मला खात्री आहे.
- जनरल बिपीन रावत, सेनाप्रमुख