...अखेर नाशकातील वाहन उचलेगिरीचा सिलसिला थांबलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:14 PM2019-10-11T17:14:02+5:302019-10-11T17:48:19+5:30
या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला.
नाशिक : स्वत:च पोलीस असल्याचा अर्विभाव बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांशी उद्धटपणे बोलणे, दुचाकी निर्दयीपणे उचलत नुकसान करणे अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढा ‘टोइंग’ कारवाई’बाबत नाशिककरांकडून वाचला जात होता; मात्र पोलीस प्रशासनाला त्याविषयी फारसे गांभीर्य वाटत नव्हते. टोइंगचा ठेका देताना घालून दिलेले नियम, निकष पायदळी तुडवून जनमानसात टोइंगमुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अखेर पटले. त्यामुळे त्यांनी ‘टोइंग’चा सिलसिला तुर्तास थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहे.
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा निर्माण होईल, या पध्दतीने वाहने उभी करणाºया वाहनचालकांची वाहने उचलून नेली जात होती. दंडात्मक कारवाईनंतर वाहनाचा ताबा त्या वाहनचालकाला पुन्हा दिला जात होता. या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना नाशिककरांच्या मनात पोलिस दलाविषयीदेखील नकारात्मक भावना वाढीस लागली. अनेकदा नागरिकांनी त्यांच्या तक्रारी थेट सहायक आयुक्तांपासून तर थेट आयुक्तांपर्यंत पोहचविल्या. यानंतर नांगरे-पाटील यांनी टोइंग वाहनावरील मुलांना बोलावून त्यांना शिस्तीचे ‘धडे’देण्याचे अधिकाऱ्यांना फर्मानही सोडले. त्यानुसार ‘हजेरी’ घेतली गेली; परंतू नव्याचे नऊ दिवस काहीसा सुधार जाणवला; पुन्हा तेच पहिले पाढे...’ त्यामुळे अखेर संबंधित ठेकेदाराचा टोइंगचा वादातीत ठेकाच रद्द करण्याचा आदेश पोलीस प्रशासनाकडून घेतला गेला. त्यामुळे नाशिककरांची टोइंगवाल्यांच्या जाचातून तुर्तास तरी मुक्तता झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
...पण, नाशिककरांनो कर्तव्य आपलेच आहे
टोइंग ठेका रद्द झाल्यानंतर नाशिककरांनी आपले कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक भान राखून रहदारीला अडथळा होणार नाही, या पध्दतीने आपली वाहने शिस्तबध्दरित्या उभी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतुक कोंडीचा त्रास सर्वसामान्यांनाच करावा लागतो, याची जाणीव ठेवून आपल्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळेल, असे वर्तन टाळण्याची गरज असल्याचे वाहतूक शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.