अखेर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:01 AM2020-08-24T01:01:00+5:302020-08-24T01:01:21+5:30
आठवडाभरापासून गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रविवारी (दि.२३) धरण जवळपास ९४ टक्के भरले. त्यामुळे दुपारी एक वाजता या हंगामातील पहिला विसर्ग गोदावरीच्या पात्रात केला गेला.
नाशिक : आठवडाभरापासून गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रविवारी (दि.२३) धरण जवळपास ९४ टक्के भरले. त्यामुळे दुपारी एक वाजता या हंगामातील पहिला विसर्ग गोदावरीच्या पात्रात केला गेला. सुरु वातीला ५०० क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत विसर्ग ११०० क्यूसेकपर्यंत वाढविला गेला. विसर्ग कमी असल्याने व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग उशिरापर्यंत कायम होता.
गंगापूर धरणात पावसाचा जोर वाढल्यास कधीही मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाण्याची श्यक्यता लक्षता घेता गोदावरी नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे. शनिवारी विसर्गाची सूचना प्रशासनाने दिली यामुळे नदीकाठावरील लोक, व्यावसायिक सतर्क झाले. तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला बचावकार्याच्या सामग्रीसह हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी या गावांना पाण्याचा वेढा पडतो. तसेच शहरात सराफ बाजार, सरदार चौक, म्हसरूळ टेक, आसराची वेस, गाडगेमहाराज धर्मशाळा, नावदरवाजापर्यंत पाणी शिरते. मागील वर्षी ४ आॅगस्ट रोजी थेट नरोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाल्याने महापूर आला होता. यंदा मात्र तशी स्थिती नाही. अतिवृष्टी पाणलोट क्षेत्रात नसल्याने पूरस्थिती ओढवण्याचा धोका सध्यातरी कमी आहे.