..अखेर ‘ती’चा ‘बाॅर्डर’ ओलांडण्याचा मार्ग खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:29+5:302021-04-01T04:16:29+5:30
नोकरीच्या शोधात असताना बांग्लादेशातील बोरिशाल जिल्ह्यात राहणाऱ्या मैत्रिणीने दाखविलेल्या मुंबईच्या ब्यूटिपार्लरमधील नोकरीच्या आमिषाला बळी पडत तिने नदीच्या पात्रातून भारत-बांग्लादेशाची ...
नोकरीच्या शोधात असताना बांग्लादेशातील बोरिशाल जिल्ह्यात राहणाऱ्या मैत्रिणीने दाखविलेल्या मुंबईच्या ब्यूटिपार्लरमधील नोकरीच्या आमिषाला बळी पडत तिने नदीच्या पात्रातून भारत-बांग्लादेशाची सीमा २०१९ साली ओलांडली. रेल्वेतून मुंबईत पोहोचल्यानंतर संशयित मैत्रिणीने देहविक्रयाच्या दलदलीत आणून हात सोडला अन् मैत्रीचा विश्वासघात केला. मुंबईतील देहविक्रयाचा काळाबाजार चालविणाऱ्या एका ‘आंटी’ने तिच्यामार्फत स्वत:ची चांगली ‘कमाई’ करून घेतली आणि भारताचे तिच्या नावानेच बनावट आधार कार्डही हातात टेकविले अन म्हणाली, ‘ये तू रहने दे अपने पास, काम आयेगा....’ काही महिने पीडितेने या दलदलीत काढले.
---इन्फो---
एका ग्राहकाने पोहोचविले नाशकात
एका पुरुषाने तिची मजबुरी हेरली आणि ‘आंटी’च्या हातावर रक्कम देत तासाभरासाठी बाजारातून बाहेर आणले आणि थेट नाशिकला पोहोचविले. सिडको भागात एका कुटुंबात ती पंधरा दिवस राहिली. यावेळी अंबड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बांग्लादेशी नागरिक म्हणून पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत तिच्याविरुद्ध पारपत्र कायदा, परकीय नागरिक कायद्याप्रमाणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
---इन्फो---
...म्हणून पीडितेला दंडाची शिक्षा
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गावंडे यांच्या न्यायालयात झालेल्या अंतिम सुनावणीत पीडितेचे वय आणि तिचा झालेला छळ लक्षात घेता न्यायालयाने तिला माणुसकीच्या भावनेतून पारपत्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दोनशे रुपये दंड व न्यायालयीन कामकाज आटोपेपर्यंतची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी वकील ॲड.विद्या देवरे निकम यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले तसेच तीन महिन्यांमध्ये न्यायालयाने खटल्याचा निकाल देत पीडितेला दिलासा दिला आणि तिला तीच्या मायदेशी पाठविण्याचे आदेश पोलीस व अन्य सरकारी यंत्रणेला दिले.
---इन्फो---
पोलिसांचा थेट ‘कंट्री डायरेक्टर’सोबत संपर्क
न्यायालयीन आदेशाप्रमाणे पीडित तरुणीच्या पत्त्याची पडताळणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कमलाकर जाधव यांनी सुरू केली. त्यासाठी पोलिसांनी ‘कंट्री डायरेक्टर जस्टिस ॲण्ड केअर’शी संपर्क साधून पीडित तरुणीच्या पत्त्याबाबत तसेच कुटुंबीयांबाबत पडताळणी करण्याची विनंती केली. संबंधितांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालाद्वारे पीडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो तिने ओळखले. तिचे वडील मयत झाले असून, आई, भाऊ, बहिणींकडे राहणारी पीडित तरुणी बारावी उत्तीर्ण असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळाले. न्यायालयाच्या आदेशानंतर पीडित तरुणीला ‘वात्सल्य’ महिला सुधारगृहालयात वर्षभराकरिता ३१ जुलैपासून दाखल करण्यात आले होते.
--इन्फो--
...म्हणून ‘बीएसएफ’चा नकार
न्यायालयाचा प्रत्यार्पणाचा आदेश झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे जाधव यांनी तपास सुरू करत पत्रव्यवहार करून सीमा सुरक्षा दलाशी (बीएसएफ) संपर्क साधला. यावेळी त्यांच्या मुख्यालयाने तीच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने तीला सीमेपार पाठविता येणार नाही, अशी शंका उपस्थित केली. त्यामुळे या गुन्ह्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले गेले आणि न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी या खटल्यात महत्त्वाचे दाखले दिले. तसेच तपासी अधिकारी कमलाकर जाधव यांनी यासाठी परिस्थितीजन्य सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर केले.