अखेर जिल्हा परिषदेला ‘इतिवृत्त’ प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:42 AM2018-02-27T01:42:17+5:302018-02-27T01:42:17+5:30
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. प्रशासकीय इमारतीच्या जागा हस्तांतरणाबाबत सर्व शासकीय सोपस्कर पूर्ण होऊनही केवळ पशुसंवर्धनमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेचे इतिवृत्त प्राप्त नसल्याने जिल्हा परिषदेला पुढे पाऊल टाकणे कठिंण झाले होते. आता पशुसंवर्धन विभागाकडील इतिवृत्त प्राप्त झाल्यामळे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची सध्याची जागा अपुरी असल्याने आणि वाहनतळाचा प्रश्न बिकट झाल्याने जिल्हा परिषदेला नव्या जागेची प्रतीक्षा होत. त्र्यंबकरोडवरील पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुट पालन केंद्राच्या जागेवर नूतन इमारत बांधण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडूनदेखील हिरवाकंदील मिळाला होता. मात्र त्यानंतर या संदर्भातील हालचाली मंदावल्याने नवीन जागेचा प्रश्न काहीसा मागे पडला होता. असे असले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करीत नूतन इमारतीबाबत व्यापक प्रयत्न केले होते. मागीलवर्षी जुन-जुलैमध्ये पशुसंवर्धन विभागाची जागा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी देण्याबाबत मंत्री जानकर यांच्या कार्यालयात बैठक झाली होती. परंतु जागा हस्तांतरित करण्याबाबत लेखी नसल्याने जिल्हा परिषदेसमोरदेखील पेच निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेने ५० कोटी रुपयांची सहा मजली प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव करून तो शासनाकडे पाठविला होता. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्याकडे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ५० कोटी रुपयांची मागणी केली होती. शासन दरबारी पत्रव्यवहार करण्याची सर्व तयारी झालेली असताना जागा हस्तांतरणासंदर्भात इतिवृत्तदेखील नसल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेला इतिवृत्ताची प्रतीक्षा होती.
अशी असेल इमारत
त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कलजवळ असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागेत जिल्हा परिषदेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे १८ हजार २४१ चौरस मीटरमध्ये सदर इमारत उभी राहणार आहे. तळमजल्यासह सहा मजली भव्य इमारत उभारण्याचा हा प्रस्ताव असून, सदर इमारत पर्यावरणपूरक बनविण्याचा मानस जिल्हा परिषदेने केला आहे. तसा प्रस्तावच तयार करण्यात आला असून नैसर्गिक वातावरण लाभेल यादृष्टीने प्रत्येक मजल्याचे बांधकाम केले जाणार आहे. अतिशय कमी जागा वापरून जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.