दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 10:16 PM2021-03-03T22:16:15+5:302021-03-04T01:09:44+5:30
नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते.
नाशिक : जिल्ह्यातील दोघा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सदर जवान हे प्रत्यक्ष कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडले होते.
राज्य शासनाने साकोरी झाप, ता. मालेगाव येथील शहीद नायक सचिन विक्रम मोरे यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सचिन मोरे यांच्या पत्नी सारिका मोरे यांच्या नावावर ६० लाख रुपये, तर वीरमाता जिजाबाई विक्रम मोरे व वीरपिता विक्रम मोरे यांच्या नावे प्रत्येकी २० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ जून २०२० रोजी देशांतर्गत सुरक्षेसंबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेंतर्गत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पूर्व लडाख येथील अतिउच्च भागात कार्यरत असताना सचिन मोरे यांचा शौक नदीत बुडून मृत्यू झाला होता.
शासनाने खालप, ता. देवळा येथील हवालदार विजय काशीनाथ निकम यांच्याही वारसांना २५ लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहीद विजय निकम यांच्या पत्नी अर्चना विजय निकम यांना २५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. विजय निकम यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असल्याने केवळ वीरपत्नीलाच अर्थसाहाय्य केले जाणार आहे. दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी देशांतर्गत सुरक्षासंबंधी ऑपरेशन रक्षक मोहिमेंतर्गत जम्मू-काश्मीर येथील नियंत्रण रेषेवरील अतिउच्च ठिकाणी कार्यरत असताना खराब हवामानामुळे विजय निकम यांचा मृत्यू झाला होता.