बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांची आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:04 AM2021-12-17T01:04:11+5:302021-12-17T01:04:44+5:30
बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, याचा निषेध करण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्याअनुषंंगाने मनमाड शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद होत्या. संपामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली.
मनमाड : बँकांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील बँक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, याचा निषेध करण्यासाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्याअनुषंंगाने मनमाड शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद होत्या. संपामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक कोंडी झाली.
दररोज सकाळी बँक उघडण्यापूर्वीच बँकेच्या प्रांगणात ग्राहकांची गर्दी असते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र बँक, देना बँक अर्थात बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा बँकांच्या शाखा आहेत. त्यामुळे दिवसभर या परिसरात मोठी वर्दळ असते; परंतु गुरुवारपासून दोन दिवस बँकांचा संप सुरू झाल्याने बँकांच्या आवारात शुकशुकाट दिसून आला. बँकेत आर्थिक व्यवहारात आलेल्या ग्राहकांना संप असल्याचे समजल्याने पुन्हा माघारी जावे लागले. या संपामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. तब्बल आठ कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्याने संपाची तीव्र झळ अनुभवयाला आली. खाजगी आणि सहकारी बँका वगळता सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा संपात सहभागी झाल्याने बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले. बँकांतील चेक क्लिअरिंग ठप्प झाले होते. केंद्र सरकारने सर्वच क्षेत्रांत खाजगीकरणाचा धडाका लावला असून सध्या एका विधेयकानुसार काही बँकांचे विलीनीकरण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. बँकांच्या खाजगीकरणाला कर्मचाऱ्यांचा मात्र मोठा तीव्र विरोध आहे.