जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार
By admin | Published: April 8, 2017 12:35 AM2017-04-08T00:35:56+5:302017-04-08T00:36:09+5:30
नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत.
नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बेचैनी वाढली आहे. त्यातच मार्च एण्डला दिलेले धनादेशही वटत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मक्तेदारांनी लेखा विभागाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा
परिषद अध्यक्ष यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना पाचारण केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत नोटाबंदीनंतर अचानक चार दिवसांत जमा झालेल्या ३४१ कोटींची गंगाजळी स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच जिल्हा बॅँकेत जमा होणारे जिल्हा परिषदेच्या हजारो प्राथमिक शिक्षकांचे वेतन होत नसल्याने त्यांनी त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाचा १७ कोटींचा धनादेश वटत नसल्याने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर हा १७ कोटींचा धनादेश जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करीत क्लिअर केला होता. आताही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे सुमारे ३५ ते ४० कोटींच्या रकमेचे धनादेश क्लिअर होणे बाकी आहे. तसेच विकासकामांच्या पोटी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने अदा केलेली सुमारे ७० ते ८० कोटींची देयकेही रखडली आहे. त्यामुळे काही मक्तेदार जिल्हा परिषद व जिल्हा बॅँकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहेत.
तिकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय पातळीवर चर्चा करून जिल्हा बॅँकेला एक संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. सोमवारी (दि. १०) मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांना जिल्हा परिषदेत बोेलविले आहे. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)