लोणजाई गडाच्या विकासाला आर्थिक पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:02 PM2019-02-28T17:02:12+5:302019-02-28T17:02:30+5:30
विंचूर : साडेचार कोटींच्या निधीमुळे रुपडे पालटणार
विंचूर : निफाड तालुक्यातील ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या लोणजाई मातेच्या गडावर विविध विकासकामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भरघोस निधी मंजुर झाल्याने पायाभुत सुविधांसह विकासकामांमुळे लोणजाई माता मंदिराचे रु पडे पालटणार असून, निफाड तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र अशी नविन ओळख मिळणार आहे.
निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून पाच ते सहा किमी अंतरावर विंचूर नजीक सुभाषनगर गावाजवळ आहे. जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणजाई माता मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत गेल्या वर्षी ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला होता. तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन स्थळांचा विकास व तेथे पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजुर केल्याने गडावर विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत तीन कोटी पन्नास लक्ष रु पये, ग्रामविकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकासासाठी ८७ लक्ष असा एकूण ४ कोटी ३८ लक्ष रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे प्रसादालय, मुख्य प्रवेशद्वार, पर्यटकांसाठी बैठक ओटे, डोंगर रस्ते, निरीक्षण मनोरे, अॅम्पी थिएटर संगीत कारंजे, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन, भक्त निवास, स्वच्छता व स्नानगृहे बांधण्यात येणार असल्याने लोणजाई डोंगरावर भाविक व पर्यटकांची मांदियाळी बघावयास मिळणार आहे. सद्यस्थितीत डोंगरावर सात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते.
मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड
श्रीमंत बाजीराव पेशव यांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी लोणजाई डोंगरावर सुंदर असे मंदिर बांधले. माजी सरपंच मधुकर दरेकर यांच्यासह स्थानिकांनी लोकसहभागातून तसेच नाना महाराज भक्त परिवार यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. १८ फूट उंचीचा १०८९ चौ. फुटाचा मंदिराचा गाभारा व प्रशस्त सभामंडप भाविकांचे लक्ष वेधुन घेतो. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी वर्गाने तसेच पंचायत समितीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.