विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:21 PM2020-01-08T22:21:55+5:302020-01-08T22:22:40+5:30
आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसंग्रहाचे उंबरठाण येथे प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
सुरगाणा : आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसंग्रहाचे उंबरठाण येथे प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर रानकवी तुकाराम धांडे, मधुचंद्र भुसारे, देवचंद महाले, तुकाराम चौधरी, सुरेश टोपले, रतन चौधरी, विजय कामडी, डॉ. मिथिलेश अहिरे, गोविंद पाटील, प्राचार्य एकनाथ आहेर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पातरी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी रानकवी धांडे यांनी माणूस कितीही मोठा झाला तरी मायबोली भाषा, माती आणि मातेला कधीच विसरू शकत नाही. आपले साहित्य हे बोलीभाषेमधून असेल तर साहित्याला साज चढतो, असे मत त्यांनीव्यक्त केले. आदिवासी संस्कृती ही नैसर्गिक जीवनशैलीवर आधारित आहे, असे मत कवी भुसारे यांनी व्यक्त केले. एकनाथ आहेर, मधुचंद्र भुसारे, गोविंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले. आदिवासींचे जीवन हे सुख-दु:खाच्या वाटांनी भरलेले आहे. दररोजच्या जगण्याचे चित्रण, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा भावेश बागुल या आदिवासी युवकाने पातरी या काव्याच्या रूपाने शब्दबद्ध केला आहे. कविता ही अंत:करणातून यावी लागते. समाजातील वास्तवाच्या वेदना मांडाव्या लागतात, असे मत बीडकर यांनी सांगितले.