चौकशीचा अहवाल पाठविण्यास मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:40 AM2017-08-24T00:40:57+5:302017-08-24T00:41:02+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्ती प्रकरणी चौकशीची कारवाई पूर्ण झाली असून, जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीचा केलेला चौकशीचा अहवाल मात्र पणन महामंडळाकडे पाठविण्यास चालढकल करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्ती प्रकरणी चौकशीची कारवाई पूर्ण झाली असून, जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीचा केलेला चौकशीचा अहवाल मात्र पणन महामंडळाकडे पाठविण्यास चालढकल करण्यात येत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, चार दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (दि.२१) जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे सेवेत रुजू झाले असून, लवकरच ते यासंदर्भातील अहवाल पणन संचालकांकडे पाठविणार असल्याचे वृत्त आहे. बाजार समितीच्या बरखास्तीचे अधिकार पणन संचालकांना असल्याने नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पाठविलेल्या अहवालावरच पणन संचालक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीचा निर्णय घेणार असल्याचे समजते. जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत बाजार समितीच्या संचालकांचे म्हणणे व लेखी खुलासे जमा केले असून, त्यानुसार बाजार समितीच्या बरखास्तीची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. पणन कायदा कलम ४५ नुसार आर्थिक अनियमिततेसह दहा मुद्द्यांवर बाजार समितीच्या संचालकांची चौकशी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी केली. सुरुवातीला १० जुलैनंतर २९ जुलै, ३ आॅगस्ट व नंतर १० आॅगस्ट तसेच अंतिम सुनावणी मागील सोमवारी (दि. १४) बाजार समितीच्या संचालकांची चौकशी व युक्तिवाद पूर्ण झाल्याने त्यासंदर्भात अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी तयार केला आहे. गेल्या बुधवारपासून (दि.१६) जिल्हा उपनिबंधक रजेवर होते. ते सोमवारी (दि.२१) रुजू झाले. लवकरच ते हा अहवाल पणन संचालकांकडे नाशिक बाजार समितीच्या केलेल्या चौकशीचा अहवाल सादर करणार असल्याचे समजते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ते या ना त्या कामांमध्ये अडकल्यानेच त्यांना हा अहवाल पाठविण्यास वेळ मिळाला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते अहवाल कधी पाठविणार याकडे बाजार समितीच्या बरखास्तीची मागणी करणाºया तक्रारदारांचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वीच बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड झाली असून, या सभापती व उपसभापतींचे पद औट घटकेचे ठरण्याची चिन्हे या बरखास्तीमुळे निर्माण झाली आहे.