महिला उमेदवार शोधताना साऱ्यांचीच दमछाक !

By admin | Published: February 16, 2017 12:54 AM2017-02-16T00:54:27+5:302017-02-16T00:54:38+5:30

राखीव गट-गण : आदिवासी भाग आघाडीवर, राजकीय पक्षांची स्थिती सारखी

Finding a women candidate is a tiring! | महिला उमेदवार शोधताना साऱ्यांचीच दमछाक !

महिला उमेदवार शोधताना साऱ्यांचीच दमछाक !

Next

 संजय दुनबळे नाशिक
महिलांनी राजकारणातही सक्रिय व्हावे यासाठी संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच ठिकाणी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आल्याने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षणसुद्धा त्याच पद्धतीने आरक्षण करण्यात आले. मात्र राजकीय पक्षांना महिला उमेदवार शोधताना खूपच दमछाक झाल्याचे दिसून आले. तुलनेने शंभर टक्के आदिवासी असलेल्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यांमधील महिला मात्र आशादायक चित्र पहावयास मिळाले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून गावोगावी प्रचाराचा धुरळा उडु लागला आहे. महिलांसाठी राखीव झालेल्या सर्वच गट गणांवर महिला उमेदवार उभे करणे सक्तीचे असले तरी मोठमोठ्या राजकीय पक्षांनाही काही गट व गणांमध्ये उमेदवार उभे करता आले नाही. देशी भागात अशी स्थिती असली तरी शंभर टक्के आदिवासी असलेल्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तीनही तालुक्यांमध्ये एखादा अपवाद वगळता सर्वच पक्षांना महिला उमेदवार मिळाले असून त्यांच्यामध्ये चुरशीचा सामना होत आहे.
पेठ तालुक्यात एक गट आणि दोन गण महिला राखीव आहेत. या तीनही जागेवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. सुरगाणा तालुक्यात माकपा विरोधात सर्वच पक्ष एकवटले असून येथे स्थानिक पातळीवर युती आघाडी असल्याने सोयीप्रमाणे महिला उमेदवार देण्यात आले आहेत. सुरगाण्यात तीन गट आणि तीन गण महिला राखीव आहेत. हट्टी गटात शिवसेनेने तर भवाडा गटात भाजपाने उमेदवार दिलेला नाही. तर गोंदुने गटात कॉँग्रेस, भाजपा, सेना या पक्षांचे महिला उमेदवार नाहीत. भवाडा गणात सेना -भाजपाचे उमेदवार नाहीत. पळसन गणात राष्ट्रवादी, भाजपा आणि कॉँग्रेसचे उमेदवार नाहीत. इगतपुरी तालुक्यात दोन गट आणि पाच गण महिला राखीव असून या तालुक्यात सर्वच ठिकाणी सर्व पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत.
कसमादे भागात मात्र महिला उमेदवारांबाबत राजकीय पक्षांची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे दिसुन येते. कळवण तालुक्यात दोन गटांपैकी खर्डे दिगर गटात सर्व पक्षांना महिला उमेदवार मिळाले आहेत. मानूर गटात मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि माकपा यांच्यातच लढत होत आहे. शिवसेना, भाजपा, आणि कॉँग्रेस या बड्या राजकीय पक्षांना येथे उमेदवार मिळू शकले नाहीत. येथे कॉँग्रेसने उमेदवार देण्याचा प्रयत्न केला मात्र छाननीत अर्ज टिकला नाही. तालुक्यातील चार गणांपैकी निवाणेत कॉँग्रेसला, कनाशीत शिवसेनेला, मानूरमध्ये शिवसेना आणि भाजपा व नरुळ गणात राष्ट्रवादी कॉँग्रेसला महिला उमेदवार मिळू शकले नाहीत.
बागलाण तालुक्यात चार गटांपैकी ठेंगोडा गटात शिवसेनेला तर ब्राम्हणगाव गटात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांना महिला उमेदवार मिळू शकले नाहीत. सटाण्यात तब्बल सात गण महिला राखीव असून अंबासन, नामपुर, कंधाणे, जायखेडा या चारच गणांमध्ये सर्व पक्षांचे महिला उमेदवार आहेत. पठावे दिगर गणात तर फक्त राष्ट्रवादी कॉँग्रेसलाच उमेदवार मिळाला आहे. ठेंगोडा गटात शिवसेनेला, वीरगावला कॉँग्रेसला उमेदवार मिळालेले नाहीत. देवळा तालुक्यात दोन गट आणि तीन गण महिलांसाठी राखीव असून दोन्ही गटात सर्वच पक्षांना उमेदवार मिळालेले आहेत. गणात मात्र परिस्थिती फारशी चांगली नाही. लोहोणेर आणि दहिवड गणात बहुतेक सर्वच पक्षांना उमेदवार मिळाले आहेत. वाखारी गणात शिवसेना, कॉँग्रेससारख्या पक्षांना महिला उमेदवार देता आले नाहीत.
चांदवडला सर्वच पक्षांना दोन गट आणि चार महिला राखीव गणांमध्ये उमेदवार मिळाले असून प्रत्येक गट आणि गणात चुरशीचा सामना होत आहे. येवला तालुक्यात तीन गटांपैकी नगरसुल गटात कॉँग्रेस, भाजपाला उमेदवार मिळु शकले नाहीत तर राजापूर आणि मुखेड या दोन्ही गटांमध्ये सर्व पक्षांनी आव्हान उभे केले आहे. गणांपैकी पाटोदा, राजापूर, अंदरसुल, मुखेड याठिकाण सर्वांना उमेदवार मिळाले आहेत. सावरगाव गणात फक्त शिवसेनेलाच महिला उमेदवार देता आला. या तालुक्यात काही ठिकाणी बसपानेही महिलांना उमेदवारी दिली आहे. नांदगावी दोन गटात आणि चार गणांत सर्व जागांवर सर्व पक्षांच्या महिला उमेदवार रिंगणात आहेत.
सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडीला गट, गण मिळुन तीन ठिकाणी महिला उमेदवार शोधणे शक्य झाले नाही. देवपूर गटात कॉँग्रेसने महिला उमेदवार दिला मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. शिवसेनेने मात्र सर्व गट आणि गणात महिलांना उमेदवारी दिली आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आणि अहिवंतवाडीत माकपाला महिला उमेदवार मिळालेले नाहीत. मातेरेवाडी गणता भाजपा आणि कॉँग्रेससारख्या पक्षांना उमेदवार मिळाले नाही. तर उमराळे, वणी, लखमापूर गणांमध्ये सर्वच पक्ष महिला उमेदवार मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

Web Title: Finding a women candidate is a tiring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.