निष्काळजी नागरिकांना दंड करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:33 AM2018-08-30T00:33:47+5:302018-08-30T00:34:13+5:30

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा,

Fine careless people! | निष्काळजी नागरिकांना दंड करा!

निष्काळजी नागरिकांना दंड करा!

Next

नाशिक : शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा, असे आदेश महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत.  समितीची बैठक बुधवारी (दि.२९) सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी आरोग्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली. यावेळी सभापतींनी आदेश दिले. त्याचवेळी नागरिकांच्या घरात एका ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल तर पाचशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे जीवशास्त्रज्ञ गायकवाड यांनी सांगितले.
शहरात जानेवारीपासून आत्तापर्यंत पाचशेच्यावर संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या गेली असून, चालू महिन्यात ७६ डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभापती सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. आरोग्य विभाग प्रबोधनावर भर देत असला तरी नाशिकची लोकसंख्या वीस लाख असून, एक लाख पत्रकांनी काय होणार असा प्रश्न करीत त्यांनी शहरात होर्डिंग्ज लावण्याबरोबरच अस्वच्छता ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश दिले. ज्याच्या घरात डेंग्यूचे रुग्ण होतात त्यांच्यावर कठीण प्रसंग येत असतो. मात्र, आसपासच्या रहिवाशांच्या घरातच डेंग्यू डास होत असतात. झोपडपट्टी विभागात हा प्रकार नसून चांगल्या वस्त्यांमध्येच हा प्रकार घडत असल्याने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले.
महापालिकेच्या वतीने घरभेटी देण्याचे काम सुरू असून महिन्याकाठी केवळ ६० हजार घरांनाच भेटी देता येतात, पाच ते साडेपाच लाख घरांना भेटी देण्यासाठी किमान ७६० सुपरवायझर असले पाहिजे, असे सांगून कुलकर्णी यांनी डास निर्मूलनाच्या ठेकादाराकडून महापालिका योग्य पध्दतीने काम करून घेत नाही. त्यामुळे ठेकेदार बदलण्याची सूचना केली.  यावेळी संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे आणि रूची कुंभारकर यांनी, डास निर्मूलनासाठी फवारणी होत नाही, तक्रार करूनही त्या भागात फवारणी करणारे कर्मचारी पोहोचत नाहीत अशा तक्रारी केल्या तसेच ज्या ठिकाणी नागरिक कर्मचाºयांना घरात प्रवेश करू देत नाही त्यांच्यासाठी ओळखपत्र जवळ ठेवून त्यांना त्यांच्याच सुरक्षिततेसाठी घरतपासणी होत असल्याची जाणीव करून द्यावी, अशी सूचना केली. शोभा साबळे यांनी महापालिकेच्या शाळा विशेषत: जुन्या नाशिकमधील शाळांमध्ये अस्वच्छता असल्याची तक्रार केली.
त्यावर शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी खुलासा केला.  महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन नसल्याची तक्रार प्रतिभा पवार यांनी केली तर त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांनी महापालिकेच्या चार मोठ्या रुग्णालयांपैकी डॉ. झाकीर हुसेन व सिडकोतील श्री समर्थ रुग्णालयात अद्याप सोनोग्राफी केंद्र नसून सिंहस्थ निधीतून हे काम होत असल्याचे सांगितले. त्यावर सिंहस्थ पार पडूनही अद्याप ही सुविधा मिळत नसल्याने संतोष गायकवाड आणि रूची कुंभारकर यांनी नाराजी व्यक्त केली.
..तरच डेंग्यू रुग्ण घोषित करा
महापालिकेच्या हद्दीतील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना साथरोगांचे रुग्ण कळविण्याची सक्ती करण्यात आली असून प्राथमिक चाचणीत रुग्ण घोषित करू नये, राष्टÑीय विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून अधिकृत अहवाल आल्यानंतरच डेंग्यू रुग्ण घोषित करावेत, अशा सूचना देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांनी सांगितले.
डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध
डेंग्यू डासाच्या उत्पत्ती स्थळांच्या शोध मोहिमेअंतर्गत ४७३ बांधकामांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. शासकीय इमारती आणि मनपाच्या शाळा इमारती अशा ३१५ मिळकतींची तपासणी करण्यात आली असून २२३ ठिकाणी टायर्स तपासणी तसेच २३३ गोठ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Fine careless people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.