मोबाइल साहित्य विक्रेत्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:27+5:302021-05-11T04:15:27+5:30
नाशिक : एमजीरोड परिसरातील प्रधान पार्क व्यापारी संकुलाच्या आवारात असलेल्या मोबाइल खरेदी-विक्रीच्या बाजारातील काही विक्रेते दुकानांचे शटर अर्धवट स्थितीत ...
नाशिक : एमजीरोड परिसरातील प्रधान पार्क व्यापारी संकुलाच्या आवारात असलेल्या मोबाइल खरेदी-विक्रीच्या बाजारातील काही विक्रेते दुकानांचे शटर अर्धवट स्थितीत उघडून ग्राहकांशी व्यवहार करताना सोमवारी (दि.१०)पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी विक्रेत्यांसह ग्राहकांवरही कारवाई केली.
शहरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवा सशर्त सुरू आहेत. सकाळी ११ पर्यंत या सेवा सुरू असून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. मात्र तरीदेखील प्रधान पार्क येथील मोबाइल दुरुस्ती करणारे व साहित्य विक्री करणारे व्यावसायिक चोरीछुप्या पद्धतीने व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आले.
अनेक दिवसांपासून बहुतांश दुकानदार शटर बंद करून आपला व्यवसाय करत होते. सोमवारी सरकारवाडा पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करीत तेथील व्यावसायिक व त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना दणका दिला.
सोमवारी सकाळी सरकारवाडा पोलीस परिसरातून नियमितपणे गस्त करत असताना तेथील काही दुकानाबाहेर लोकांची गर्दी दिसली. दुकाने बंद असतानाही तेथे गर्दी झाल्याने पोलिसांनी चौकशी केली असता काही दुकानदार शटर बंद करत आतमधून सेवा पुरवताना लक्षात आले. कोणाच्या मोबाइलची दुरुस्ती तर काहींना हव्या असलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक सुटे भागची विक्री करत होते. त्यामुळे पोलिसांनी याची माहिती मनपा प्रशासनाला कळवून अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवून घेतला. त्यानंतर या संकुलाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. यावेळी ७ ग्राहकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड केला. ज्या दुकानाचे दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवून व्यवसाय होत होता ते दुकान सील केले. तसेच मनपाने एका व्यावसायिकाकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईने येथील मोबाइल मार्केटमध्ये खळबळ उडाली.