दंडुक्याच्या प्रसादासह बसला आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:31+5:302021-05-14T04:15:31+5:30
नाशिक : शहर व परिसरामध्ये बुधवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १४) लॉकडाऊनचा दुसरा दिवस होता. ...
नाशिक : शहर व परिसरामध्ये बुधवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १४) लॉकडाऊनचा दुसरा दिवस होता. नाशिककरांचा चांगला प्रतिसाद पाहावयास मिळाला. दरम्यान, शहर व परिसरात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त दिसून आला. चौकाचौकांमध्ये पोलीस तैनात होते. दिवसभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद तर दिलाच सोबत दंडाची पावतीही फाडली.
लॉकडाऊन काळामध्ये केवळ अत्यावश्यक कारणासाठी, तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची मुभा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरीदेखील गुरुवारी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास शहरातील विविध उपनगरांमध्ये नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. सातपूर, पंचवटी, जुने नाशिक, सिडको, नाशिकरोड या भागात नागरिकांचा संचार वाढल्यानंतर पोलिसांनी दंडुक्याच्या प्रसाद देत अनेकांकडून दंडाची वसुली केली. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत निश्चित करण्यात आलेल्या नाकाबंदी पॉइंटवर सकाळपासून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आयुक्तालयाच्या हद्दीत विना मास्क फिरताना आढळून आलेल्या १६८ लोकांसह संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १३९ बेशिस्त लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत एकूण सुमारे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११ दुकानदारांवर कारवाई करीत पोलिसांनी ४२ हजारांचा दंड वसूल केला. ४१ संशयितांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात आली; मात्र कोणीही कोरोनाबधित आढळून आले नाही. संचारबंदीचे सर्वाधिक उल्लंघन करणाऱ्या सर्वाधिक ७२ लोकांवर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. तसेच भद्रकाली, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, म्हसरूळ, आडगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीच्या उल्लंघन करणाऱ्यांची संख्या शून्य राहिली, हे विशेष.