लासलगावी कृषी सेवा केंद्राला आग
By प्रसाद गो.जोशी | Published: March 17, 2024 07:24 PM2024-03-17T19:24:17+5:302024-03-17T19:24:27+5:30
लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्रास दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून शेतीपयोगी कीटकनाशके व ...
लासलगाव : येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्रास दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून शेतीपयोगी कीटकनाशके व औषधे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी (दि. १७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळांचे प्रचंड लोळ आकाशात झेपावले होते. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके खते व औषधे याचा असलेला साठा जळून नुकसान झाले आहे. आग लागलेल्या दुकानामागे शेतीमालाचे विक्री साहित्य गोदाम आहे. गोदामात व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणावर औषधे व बी-बियाणे साठवून ठेवला आहे. शहरात लागलेल्या आगीमुळे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
लासलगाव येथे रविवारी दुकान नेहमीप्रमाणे बंद होते. मोठ्या पत्राच्या शेडमध्ये दुकान असून, त्यात कृषी सेवा केंद्राच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी त्याचा आकडा कळू शकला नाही. लासलगाव बाजार समितीसह अन्य ठिकाणच्या टँकरने पाणी वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. लासलगाव येथे अग्निशमन दलाचे वाहन नसल्याने निफाड, पिंपळगाव, येवला, चांदवड आदी ठिकाणचे अग्निशमन दलाचे बंब बोलविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मदत कार्यात सहभाग घेतला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आग कशामुळे लागली, हे समजू शकले नाही.