नाशिकमध्ये एसटीच्या जुन्या टायरच्या साठ्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 23:43 IST2019-12-30T23:40:21+5:302019-12-30T23:43:41+5:30
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग नियंत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू

नाशिकमध्ये एसटीच्या जुन्या टायरच्या साठ्याला भीषण आग
नाशिक : पेठरोडवर असलेल्या एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये असलेल्या जुन्या टायरच्या साठ्याला आज रात्री भीषण आग लागली. या आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. टायर पेटल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला आहे. यामुळे आजूबाजूला असलेले डिझेलचे ड्रम, जुन्या झालेल्या भंगार बसेससुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
डिझेलमुळे आग अजून भडकली असून मागील दीड तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन केंद्र, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, कोणार्कनगर विभागीय केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुमारे बावीस कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. रबरी टायर पेटल्यामुळे आग अद्याप विझलेली नाही. जवानांकडून फोम व पाण्याचा वापर केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.