अंबडमध्ये कारखान्यात आगीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 04:47 PM2021-01-31T16:47:24+5:302021-01-31T16:49:12+5:30
आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर परिसरातील कारखान्यांच्या सुरक्षा रक्षकांच्याही बाब लक्षात आली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील खेळणी तयार करणाऱ्या एका कारखान्याला रविवारी (दि.३१) पहाटे पावणेसात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे एक कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कारखाना बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तीन बंबांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.
याबाबत अधिक माहिती अशी, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये अमोल इंडस्ट्रीज नावाचा लहान मुलांची खेळणी तयार करण्याचा कारखाना आहे. रविवारी पहाटे या कारखान्यातून अचानकपणे धुराचे लोट उठू लागले आणि क्षणार्धात संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर परिसरातील कारखान्यांच्या सुरक्षा रक्षकांच्याही बाब लक्षात आली. तत्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्राचे जवान लिडिंग फायरमन देवीदास चंद्रमोरे, रवींद्र लाड, फायरमन मोहियोद्दीन शेख, संजय गाडेकर, सुनील घुगे, अविनाश सोनवणे, बंबचालक इस्माईल काजी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. पाण्याचा मारा करत भडकलेल्या आगीवर सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर दोन बंब व औद्योगिक वसाहतीचा एक अशा तीन बंबांच्या सहाय्याने सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर यश मिळविले.
या आगीत जीवितहानी टळली असली तरी कारखान्यातील पाच मोल्डिंग मशीन, सीसीटीव्ही यंत्रणा, मोठ्या प्रमाणावर कच्चा माल व तयार वस्तूंचा माल जळून खाक झाला. सुमारे एक कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किट होऊन आग भडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.