वणी येथे कांदा गुदामांना आग, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:09 PM2018-04-02T16:09:43+5:302018-04-02T16:09:43+5:30
वणी- येथील पिंपळगाव रस्त्यालगत कांद्यांच्या चाळींना सोमवारी सकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.
वणी- येथील पिंपळगाव रस्त्यालगत कांद्यांच्या चाळींना सोमवारी सकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. आग कशी व कोठून लागली हे मात्र स्पष्ट कळू शकले नसले तरी चाळींच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेताकडून आग लागल्याची चर्चा होती. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ शेकडो फूट लांब दिसत होते. या आगीत बाळचंद खाबिया यांचे ४१ गुदाम व तीन शेड, अंदाजे ५० ते ६० लाख, सचिन जवरीलाल साखला यांचे २५ गुदाम अंदाजे २५ लाख व महेंद्र किसनलाल बोरा यांचे १० ते १२ गुदाम अंदाजे १५ ते २० लाख असे जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यात बांबुच्या फ्रेम व प्लास्टिकचे कॅरेट आगीत भस्मसात झाले.आग विझविण्यासाठी प्राथमिक स्तरावर वणी ग्रामपालिकेच्या टँकरद्वारे पाणी मारण्यात आले. दरम्यान पिंपळगांव बसवंत येथील ग्रामपालिकेचा बंब व एच ए.एल ओझर येथील अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे आग आटोक्यात आली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, दिंडोरीचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे, कादवा कारखान्या चेअरमन श्रीराम शेटे, दतात्रय पाटील ,भास्कर भगरे , विलास कड, बाजीराव कावळे, मधुकर भरसट ,यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामपालीकेचे पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले घटनास्थळी पंचनाम्याचे काम तलाठी पगारे हे करीत आहे.