मेनरोड बाजारपेठेत कापड दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 02:07 PM2020-06-14T14:07:45+5:302020-06-14T14:11:08+5:30
कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती.
नाशिक : शहरातील मेनरोड या मुख्य बाजारपेठेतील धुमाळ पॉइंट येथे असलेल्या एका लहान कापड दुकानाला रविवारी (दि.१४) अचानकपणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली. परिसरातील रहिवाशी व अन्य व्यापाऱ्यांनी घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळविली. माहिती मिळताच पंचवटी उपकेंद्राच्या दोन बंबांसह जवान घटनास्थळी पोहचले. अवघ्या तासाभरात आग पुर्णपणे विझविण्यात जवानांना यश आले.
धुमाळ पॉइंट हा मेनरोडवरील अतिशय अरुंद असा भाग आहे. येथील चौकात असलेल्या एका लहान दुकानाला आग लागली. दुकानामध्ये अचानकपणे सकाळी शॉर्टसर्किट झाले आणि धुराचे लोट बाहेर दिसू लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली. तत्काळ नागरिक ांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. पंचवटी उपकेंद्राचे टेलिफोन आॅपरेटर धीरज पाटील यांनी तत्काळ लिडिंग फायरमन संजय कानडे यांना माहिती दिली. त्वरित बंबचालक बाळू काकडे व बाळू पवार यांनी जवानांना घेऊन अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. फायरमन नितीन म्हस्के, संजय माळी, सोमनाथ भालेराव, राजू कदम यांनी तत्काळ पेटलेल्या दुकानावर पाण्याचा मारा सुरू केला. दुकान बंद असल्यामुळे आग विझविण्यास सुरूवातीला काही वेळ अडथळा निर्माण झाला. दरम्यान, कापड व्यावसायिकदेखील येथे पोहचले. त्यांच्याकडून किल्ली घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचा दरवाजा उघडला. यावेळी आतमध्ये विविध लेडिज ड्रेस मटेरियल असल्याने आग चांगलीच धुमसत होती. जवानांनी वेळीच पाण्याचा मारा सुरू केल्याने आग आटोक्यात आली. पंचवटी उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी मदतकार्यास होते;मात्र बाजारपेठ असल्यामुळे शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातूनदेखील एक बंबासह जवान घटनास्थळी अतिरिक्त कुमक म्हणून पोहचले होते. या दुर्घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नसली तरीदेखील सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. यापुर्वी याच दुकानात लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू होता. तेव्हा सुमारे दोन वर्षांपुर्वी या दुकानाला आग लागली होती, असे यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.