मुसळगाव वसाहतीत कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:30 PM2019-04-27T18:30:51+5:302019-04-27T18:31:10+5:30
सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील अंगद कारखान्याला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली ...
सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील अंगद कारखान्याला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. डी-५४ मधील अंगद कारखान्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या कारखान्यात दगडी कोळश्यापासून चारकोल पावडरची निर्मिती करण्यात येते. अचानक लागलेल्या आगीत दगडी कोळश्याचे व चारकोल पावडरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पत्र्याचे शेडही जळून खाक झाले आहे.
सुदैवाने कुठलीही जीवत हानी या घटनेत झाली नाही. आगीची माहिती मिळताच माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या बंबासह नगरपालिका, नाशिकरोड व इंडियाबुल्स येथील चार बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता लागलेली आग सायंकाळी साडेपाच वाजता आटोक्यात आली. यावेळी चारकोल पावडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ भेट देऊन पहाणी केली. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंबाचे फायर आॅफीसर पी. आर. घोलप, पी. के. चौधरी, पी. पी. पाटील, टी. एस. वाखारे, एन. टी. पदीर यांनी परिश्रम घेतले.
गुन्हा दाखल
अंगद कारखान्याचा मालक हरप्रीतसिंग गोदर व व्यवस्थापक नीलेश सदगुरु या दोघांविरोधात पोलीस नाईक प्रवीण मासोळे यांनी फिर्याद दिली. लाकडी कोळशापासून पावडर तयार करीत असतांना आगीपासून जीवित व व्यक्तीगत सुरक्षा याची योग्य ती खबरदारी न घेता सुरक्षा धोक्यात आणली, आजूबाजूच्या कारखान्यांची सुरक्षा धोक्यात आणली म्हणून कंपनी मालक व व्यवस्थापकाविरोधात एमआयडीसी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.