नाशिक शहरात फटाक्यांचा ‘आवाज’च!
By श्याम बागुल | Published: November 7, 2018 03:51 PM2018-11-07T15:51:46+5:302018-11-07T15:52:44+5:30
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच्या पाच दिवसात असा शब्द प्रयोग
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या ध्वनी व वायु प्रदुषणाचा विषय गांभीर्याने घेत दिवाळी सणाच्या पाच दिवस उत्सव काळात विशिष्ट वेळेतच फटाके फोडण्याचे निर्देश सरकारला देवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून शहरात चोवीस तास फटाक्यांचाच ‘आवाज’ सुरू आहे. बुधवारी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे चार वाजेपासून सुरू झालेला फटाक्याचा दणदणाट रात्री उशिरापर्यंत कायम असला तरी, त्याबाबत कोणावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच्या पाच दिवसात असा शब्द प्रयोग केल्याने बसुबारसपासून दिवाळी सुरू झाल्याचा अर्थ शासकीय यंत्रणा व फटाके विक्रेत्यांनी काढला, व त्यानुसार फटाके विक्रीचे दुकाने थाटले आहेत. मात्र फटाके वाजविणाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाकडे सोयीस्कर डोळेझाक केली असून, गेल्या तीन दिवसांपासून रात्री तर फटाके उडविण्यातच येत आहेत, परंतु पहाटे देखील चार, पाच वाजेपासून फटाक्यांचा दणदणाट होत आहे. मोठ्या आवाजाचे सुतळी बॉम्बचा यात वापर केला जात असून, पहाटेच्या सुमारास त्याचा आवाजही चोहोंकडे घुमू लागला आहे. बुधवारी लक्ष्मीपुजन असताना व त्यासाठी सकाळी सात वाजेपासून अमृत, शुभ व लाभ असे वेगवेगळे मुहूर्त असल्याने व्यापाºयांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार वहीपुजन केले, त्यावेळी मात्र जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली गेली. रात्री उशिरापर्यंत ही आतषबाजी कायम होती. शुक्रवारी भाऊबिजेपर्यंत दिवाळी सण असून, तो पर्यंत फटाक्यांची आतषबाजी करण्यास न्यायालयाची मुभा असल्यामुळे आणखी दोन दिवस फटाके फोडली जातील. मात्र प्रदुषण करणारे व मोठा आवाजाच्या फटाक्यावर असलेल्या बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा गेल्या तीन दिवसात नजरेस पडली नाही. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्याची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. तक्रारच नाही तर कारवाई कोणावर करणार असा सवालाही त्यांनी केला. तर फटाक्याचा विषय ध्वनी व वायु प्रदुषणाशी निगडीत असल्यामुळे प्रदुषण महामंडळाकडे कारवाईसाठी बोट दाखविण्यात आले आहे.