अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन
By admin | Published: August 4, 2016 01:36 AM2016-08-04T01:36:40+5:302016-08-04T01:37:11+5:30
अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमनचे आपत्ती व्यवस्थापन
नाशिक : मंगळवारी शहरात कोसळलेल्या पावसामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मर्यादा उघड झाल्या. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असूनही केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांचा उपयोग करता आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाचे तब्बल १४० जवान चोवीस तास आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना दिसून येत आहेत.
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मंगळवारी आणि बुधवारी १४७ कॉल्स आले. त्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी अधिक होत्या. सुमारे ९३ ठिकाणी पाणी साचल्याचे कॉल्स आले तर २० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी आगी लागल्या तर २९ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन राबवावे लागले. या साऱ्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे १४० कर्मचारी कार्यरत होते. निळ्या रेषेतील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे मोठे आव्हानात्मक काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागले. दलाने एरंडवाडी येथील १२५ रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. तर रामकुंड याठिकाणी अडकलेल्या १२ प्रवाशांची बोटीच्या साहाय्याने सुटका केली.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्मला कॉन्व्हेंट परिसरातील रामजानकी परिसरातील ४ वृद्ध महिलांची तसेच तेथील जवळच एका बंगल्यातून वृद्ध दाम्पत्याची सुटका करण्यात आली. अग्निशमनच्या बचाव पथकाने चांदोरी-सायखेडा याठिकाणीही धाव घेत आठ जणांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. अग्निशमन दलाकडे पुरेशी साधनसामग्री उपलब्ध आहे परंतु त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने साधनसामग्रीचा फारसा प्रभावीपणे वापर करता येऊ शकला नाही.