पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:05 PM2020-11-28T14:05:07+5:302020-11-28T14:08:57+5:30
आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.
नाशिक :पांडवलेणी डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात शनिवारी (दि.२८) अचानकपणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये साधारणत: एक ते सव्वा हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले आहे. काही प्रमाणा वाळलेले गवत आणि जास्त वेगाने वाहणारा वारा यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.
घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनमजूर व स्थानिक तरुणांनी धाव घेत झाडाच्या फांद्याच्याअधारे (झोडपणी) आग विझविण्यास सुरुवात केली. तासाभरात आग आटोक्यात आली.पांडवलेणी येथील पंडीत जवाहरलाल नेहरु वनोद्यानापासून डोंगराच्या सभोवताली राखीव वनक्षेत्र आहे. या राखीव वनाच्या २२५ कक्ष क्रमांकामध्ये डोंगराच्या उत्तरेच्या बाजूने गौळाणे रोडच्या दिशेने सकाळी आग भडकली. सुमारे दहा वाजेच्या सुमारास डोंगरावरुन धुराचे लोट व आगीच्या ज्वाला उठत असल्याचे काही नागरिकांच्या नजरेस पडले. यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाला माहिती दिली. तसेच अग्निशमन दलालाही कळविले.
दरम्यान, पांडवलेणी राखीव वनक्षेत्र हे वनविकास महामंडळाच्या अखत्यारितित येत असल्यामुळे पश्चिम नाशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी महामंडळाचे वनक्षेत्रपाल प्रवीण डमाळे यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आगीची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच महामंडळाचे वनपाल दिपक बोरसे, वनमजूर सुदाम जाधव, नरोत्तम कोकणी, मानसिंग गावित, शिवाजी गायकवाड आदिंनी डोंगरावर धाव घेतली. जंगलातील आग विझविण्याची पारंपरिक पध्दतीचा अवलंब करत वनमजूरांनी आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र सकाळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळविताना वनमजुरांची दमछाक झाली. तासाभरानंतर आग पुर्णपणे विझविण्यास वनमजुरांसह नागरिकांना यश आले. या आगीमध्ये गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले; मात्र झाडांना सुदैवाने कमी हानी पोहचल्याचे डमाळे यांनी सांगितले. दहा वाजेच्या सुमारास डोंगराच्या पायथ्याला सिडको अग्नीशमन उपकेंद्राचा बंब दाखल झाले; मात्र डोंगरावर आग पसरलेली असल्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांनी पायथ्यालाच थांबून राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
--
आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. राखीव वनात कोणीही वावरताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल केले जाणार आहे. - प्रवीण डमाळे, वनक्षेत्रपाल