गादी कारखान्याला आग : ३५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:57 PM2017-12-14T23:57:03+5:302017-12-15T00:24:22+5:30
सटाणा : तालुक्यातील गादी व्यावसायिकांना होलसेल लोकर आणि कापूस पुरवठा करणाºया शहरातील कंधाणे फाटा परिसरातील प्रिन्स गादी कारखान्याला बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात कापसासह यंत्रसामग्री जळून खाक झाल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सटाणा व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आग विझविण्यात अपयश आल्याने लाखोंचा माल भस्मसात झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बंब न आल्याने लोकप्रतिनिधींमध्ये वाद
आगीचे वृत्त समजताच सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे व गटनेते संदीप सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन विभागाच्या बेजबाबदारपणाबद्दल संतप्त झालेल्या नगरसेवक मुन्ना शेख यांनी नगराध्यक्ष मोरे यांनाच धारेवर धरले. यावेळी मोरे यांनी दखल घेत लवकरच या विभागात मोठे फेरबदल करणार असल्याचे सांगत कर्तव्यावर असतानाही कार्यालयात हजर नसणाºया कर्मचाºयांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अग्निशमन दलावर नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आग विझविण्यासाठी धावपळ केली.