Nashik: जुने नाशिकमध्ये दुकानांमध्ये आगडोंब; ५० दुचाकींसह २ घरे बेचिराख, नऊ बंबाच्या साहायाने आगीवर नियंत्रण
By अझहर शेख | Published: April 22, 2024 10:53 AM2024-04-22T10:53:52+5:302024-04-22T10:54:19+5:30
Nashik Fire News: जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
- अझहर शेख
नाशिक - जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या सुमारे २०जवानांनी नऊ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी टाळली असली तरी लाखोंच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे.
नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे 50पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. आगीची सुरुवात या दुकानातून सकाळी झाली. अग्निशमन दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहचला तेव्हा हे दुकान पूर्णपणे आगीमध्ये हरविले होते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. काही वेळेत या दुकानात अगदी लागून असलेल्या प्लॅस्टिक भांगर मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अशरफी स्पेअर पार्ट नावाने असलेल्या दुकानाला आगीने कवेत घेतले. त्याचवेळी आग या दुकानांच्या पाठीमागे असलेल्या एजाज शेख व खैरुणीसा हनिफ सैय्यद यांच्या घरापर्यंत पोहचली. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. या सर्व दुकानांसह दोघा कुटुंबांचा संसार जळून राख झाला. यामुळे महिलांनी एकच आक्रोश केला.
जहीर शेख यांच्याही घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य वेगाने केल्याने जवानांना आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्टसर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याची चर्चा परिसरात रहिवाशांमध्ये सुरू होती. नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती व ऑटोमोबाइल, भांगरमालाची दुकाने, गेरेज, वेल्डिंगची दुकाने यांचा आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लिडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसहाक काझी, नाझीम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खरजुल, बाळू पवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवान यश वझरे उमेश सोनवणे यांनी शर्तीचे प्रयत्न करत चहूबाजूंनी पाण्याचा मारा करून आग विझवली. भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू आहे.