मिठसागरे येथे आगीत अडीच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:23+5:302021-02-06T04:23:23+5:30
मिठसागरे-पुतळेवाडीदरम्यान विठ्ठल भाऊसाहेब चतुर यांच्या शेतात हा प्रकार घडला. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग ...
मिठसागरे-पुतळेवाडीदरम्यान विठ्ठल भाऊसाहेब चतुर यांच्या शेतात हा प्रकार घडला. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन वाळलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण करत बाजूलाच सोंगणी करून ठेवलेल्या तुरीला कवेत घेतले. परिसरातील शेतकऱ्यांनी व चतुर कुटुंबीयांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पूर्ण नुकसान झाल्यावरच आग शमली. या घटनेत शेतात साठविलेला सुमारे पाच ट्रॅक्टर मका व बाजरीचा चारा अंदाजे वीस पोती उत्पादन होणारे तुरीचे पीक बेचिराख झाले. यामुळे चतुर यांचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिक्षक नेते आनंदा कांदळकर यांच्यासह मिठसागरे परिसरातील शेतकऱ्यांनी चतुर यांच्या वस्तीकडे धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. घटनेबाबत कांदळकर यांनी तहसील व पांगरी येथील तलाठी कार्यालयात माहिती दिली. महसूल विभागाने चतुर यांच्या पीक नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
महावितरणच्या जुनाट तारा वारंवार अपघातांना निमंत्रण देत आहेत. बहुतांश ठिकाणी शेतांमधून गेलेल्या तारांमध्ये झोळ पडला असून त्या हलक्याशा हवेनेही एकमेकांना चिकटतात. त्यातून शॉटसर्किट होऊन ठिणग्या पडतात व शेतीपिकांचे नुकसान होते. महावितरणने तातडीने सर्वेक्षण करून जुनाट वीजतारा बदलाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने विजेचे खांब शेतामधून न नेता ते बांधावर बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
===Photopath===
040221\04nsk_12_04022021_13.jpg
===Caption===
मिठसागरे येथे चाऱ्याच्या गंजीला लागलेली आग.