नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:42+5:302021-01-23T04:14:42+5:30

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार सुहास कांदे, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट देऊन ...

Fire at Nashik Municipal Corporation headquarters | नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग

Next

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार सुहास कांदे, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राज्यातील महापालिका आणि नगरपालिका इमारतींच्या फायर ऑडिटबाबत नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करू असे सामंत यांनी या भेटीनंतर सांगितले.

भंडारा येेथील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातदेखील फायर ऑडिट झाले नसल्याचे उघड झाले होते. त्यानंतर महापालिकेने सर्वच शासकीय व खासगी इमारती, रुग्णालये, व्यापारी संकुले यांना फायर ऑडिटची सक्ती केली असताना दुसरीकडे मात्र ही दुर्घटना घडल्याने महापालिकेचा कारभार ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (दि.२२) सकाळी महापालिकेच्या राजीव गांधी भवनात पेस्ट कंट्राेल करण्यात येणार होते. त्यामुळे शिवसेना गटनेते आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या केबीनसह त्यालगतच्या खोल्यामंध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी कर्मचारी आले त्यांनी तशी सूचना गटनेता आणि विरोधी पक्षनेत्यांच्य केबिनमधील कर्मचाऱ्यांना दिली आणि त्यानुसार ते कर्मचारी बाहेर पडले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांना तसे कळवण्यात आले. त्यामुळे ते आलेच नाहीत. पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांनी स्टोअर रूम म्हणून वापर होणारी खोली आणि त्यालगत चहापाणी केल्या जाणाऱ्या खोलीत काम सुरू केले. अगोदर स्वच्छतेसाठी त्यांनी व्हॅक्युम क्लिनर सुरू करण्यासाठी स्विच बोर्ड सुरू केला आणि काही क्षणात ठिणग्या उडून स्विच बोर्डने पेट घेतला. बघता बघता आग पसरू लागल्याने पेस्ट कंट्रोलसाठी आलेल्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी अगोदर आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आग भडकताच ते बाहेर आले. आगची प्रकार कळताच याच इमारती असलेले महापालिकेचे चार अग्निशमन दलाचे कर्मचारी धावले. त्याचवेळी गटनेता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला कळवल्याने बंब आणि जवान धावून आले. सुरुवातीला त्यांनी आग लागलेल्या दालनातील धुरामुळे त्रास होत असल्याने खिडक्या खुल्या करून धूर बाहेर जाण्यास जागा करून दिली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्वत: अग्निशमन दलप्रमुख संजय बैरागी आणि त्यांचे दहा कर्मचारी धावले. शिंगाडा तलाव येथील एक आणि पंचवटीतील दोन अशा तीन बंब दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग विझवली. इमारतीतील ड्राय पावडरच्या सिलिंडरचादेखील वापर केला आणि अखेरीस अर्ध्या तासाने आग आटाेक्यात आली.

इन्फो...

कर्मचाऱ्यांना बाहेर काढले, संगणक बंद

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी राजीव गांधी भवनातील गटनेता कक्षाजवळील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले तसेच तत्काळ संगणक आणि विजेची उपकरणे बंद करण्यास सांगितले. अवघ्या अर्धा तासात कोणतीही जीवितहानी होऊ न देता आग आटोक्यात आणल्याने अग्निशमन दलाचे नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Fire at Nashik Municipal Corporation headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.