मालेगावी हज हाऊस काेविड सेंटरचे फायर, ऑक्सिजन ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:41+5:302021-05-11T04:14:41+5:30
मालेगाव : महापालिकेच्या हज हाऊस काेविड सेंटरचे नुकतेच फायर व ऑक्सिजन अशी दाेन्ही ऑडिट करण्यात आली आहेत. नाशिकच्या डाॅ. ...
मालेगाव : महापालिकेच्या हज हाऊस काेविड सेंटरचे नुकतेच फायर व ऑक्सिजन अशी दाेन्ही ऑडिट करण्यात आली आहेत.
नाशिकच्या डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला हाेता. तर विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत १३ जणांचा हाेरपळून मृत्यू झाला होता. या घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेत सर्व खासगी तसेच काेविड केअर सेंटरचे इलेक्ट्रिकल स्ट्रक्चरल, फायर व ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. मालेगाव शहरात मनपाची तीन काेविड सेंटर आहेत. यातील हज हाऊसचे गेल्या आठवड्यात ऑडिट करण्यात आले. अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी सेंटरच्या अंतर्गत विद्युत जाेडणी, पाणी साठवणूक क्षमता, इमारतीची उंची, प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निराेधक आदी बाबींची तपासणी केली. ऑक्सिजन गळतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येथील ऑक्सिजन यंत्रणेची डाॅ. नदीम यांच्या पथकाने पाहणी केली. भविष्यात आग किंवा ऑक्सिजन गळतीसारखे प्रकार टाळण्यासाठी आवश्यक उपाययाेजनांची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. सेंटरचे व्यवस्थापक महेश नेहे यांनी फायर सेफ्टी व ऑक्सिजन यंत्रणेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त भालचंद्र गाेसावी, उपायुक्त राेहिदास दाेरकुळकर सर्व काेविड सेंटरच्या सुरक्षितता व सुविधांवर लक्ष देत आहेत.
इन्फो...
२८ रुग्ण दाखल
हज हाऊसमध्ये ४४ ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. आजमितीस सेंटरमध्ये २८ रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहर व तालुक्यातील १२, इतर तालुक्यांचे १२ तर बाहेरील जिल्ह्यांतील चार रुग्ण आहेत. रुग्णांच्या उपचार सेवेसाठी सात डाॅक्टरांसह, परिचारिका, वाॅर्डबाॅय, सफाई कामगार असे ३० कर्मचारी नियुक्त केले आहेत. रुग्णांना सकाळी नाश्ता, दाेनवेळचे जेवण दिले जाते. येथील उपचार व इतर सुविधांमुळे रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे.
इन्फो...
दिलावर हाॅल सेंटर बंदच
बाधित रुग्णांचा आलेख वाढत असताना मनपाने एप्रिल महिन्यात दिलावर हाॅलमध्ये ४४ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली हाेती. येथे बेडसह सर्व सुविधा करण्यात आली आहे. मात्र, ऑक्सिजन व स्टाफच्या कमतरतेमुळे हे सेंटर अद्याप बंदच आहे. माजी आमदार आसिफ शेख यांनी हे सेंटर सुरु करण्याची मागणी करत मनपाला निवेदन दिले हाेते.