आग सॅनिटायझर, पेस्ट कंट्रोल की शॉर्टसर्किटमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:47+5:302021-01-23T04:14:47+5:30
नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग लागण्याचा तसा हा अनेक वर्षांतील पहिलाच प्रसंग आहे. महापालिकेने कोविडच्या निमित्ताने पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरवले ...
नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग लागण्याचा तसा हा अनेक वर्षांतील पहिलाच प्रसंग आहे. महापालिकेने कोविडच्या निमित्ताने पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरवले होते. खरे तर हे काम अगोदर हेाण्याची गरज असताना वराती मागून घोडे अशी स्थिती निर्माण झाली. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णसंख्या तर आता शंभरच्या आत आली असताना आता राजीव गांधी भवन आणि महापौर निवास असलेल्या रामायण या ठिकाणी कोविडनिमित्ताने सॅनिटायझेशन करून पेस्ट कंट्रोलचे काम करण्याचे ठरवण्यात आले. विशेष म्हणजे गुरुवारी (दि.२१) स्थायी समितीवर हा प्रस्ताव मंजूर झाला आणि शुक्रवारी (दि.२२) या इमारतीत पेस्ट कंट्रोलचे काम सुरू असतानाच आग लागली. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली आहे.
पेस्ट कंट्रोलसाठी कर्मचाऱ्यांनी शिवसेना गटनेता आणि विरोधी पक्ष नेत्याच्य दालनाची विंग रिकामी केली आणि प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यामुळे घटना घडली तेव्हा केवळ पेस्ट कंट्रोल करणारे कर्मचारीच घटनास्थळी असल्याने नक्की काय घडले हे ते स्पष्ट करू शकतील.
---
काय आहेत शक्यता?
इन्फो..१
महापालिकेने एका ठेकेदारामार्फत येथे पेस्ट कंट्रोलचे काम सुरू केले होते. त्यातून येथे आग लागली असण्याची शक्यता आहे. पेस्ट कंट्रोल हे कोविडच्या निमित्ताने केले जात होते; परंतु त्यात कसला वापर होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इन्फो. २
महापालिकेने प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर ठेवले आहेत. या विंग्जमधील बाहेरील सॅनिटायझर सुरक्षित असले तरी कर्मचाऱ्यांनी संबंधित कक्ष सॅनिटाईझ करतानाही काही घडले असावे काय, अशीदेखील एक शक्यता आहे.
इन्फो..३
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रमुख कारण सांगितले जात असून, सकृत दर्शनी तीच शक्यता अधिक आहे. तथापि, काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी व्हॅक्युम क्लिनर सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक स्विच बोर्ड सुरू केल्यानंतर ठिणग्या उडून आग लागली तर काही कर्मचाऱ्यांच्या मते स्विच सुरू केल्यानंतर एसीच्या ठिकाणी जाळ झाला आणि त्यानंतर आग लागली. आता चौकशी समितीच याचे निराकरण करू शकेल.