फटाक्याने बिबट्या पळाला, मात्र उकीरडा पेटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 04:41 PM2019-02-08T16:41:23+5:302019-02-08T16:41:38+5:30
नगरसूलकरांची तारांबळ : कुडके वस्तीत अंधारातील थरार
नगरसूल : येथील लिहीत रस्त्यावरील कुडके वस्तीवर नजरेस पडलेल्या बिबट्याला फटाके फोडून पळविण्यात आले परंतु, बिबट्याच्या नादात फटाक्यांमुळे उकीरड्यावरील चाऱ्याने पेट घेतला आणि आगीने रौद्रस्वरुप धारण केले. मग आग विझविण्यासाठी थेट येवला येथून अग्निशामक दलाचा बंब मागविण्यात आला. फटाक्याच्या आवाजाने बिबट्या तर पळाला पण उकीरड्यावरील आग विझविता-विझविता मात्र वस्तीवरील नागरिकांच्या नाकीनव आले.
येवला तालुक्यातील नगरसुल येथील लिहीत रस्त्याच्या निकम वस्तीच्या मागे सखाहारी कारभारी कुडके यांच्या घरासमोरील नालाबंडींग मधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागल्याने कुडके यांची सून रोहानी हिने बाहेर येऊन पाहिले असता, तिच्या नजरेस बिबट्या पडला. रोहानीने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने तिचे पती संतोष कुडके लागलीच बाहेर आले. अंधार असल्याने त्यांनी अंगणात उभ्या केलेल्या मोटरसायकचे दिवे चालू केले आणि ते नालाबंडिंगच्या दिशेने केले असता, बिबट्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर संतोष कुडके यांनी तत्काळ यशवंत कुडके व उत्तम कुडके यांना फोनवरून बिबट्याची खबर दिली. त्यामुळे सारी कुडके वस्ती सावध झाली. ग्रामस्थांनी घरातील बॅट-या बाहेर काढून शोधमोहीम सुरू केली. यशवंत कुडके यांच्या विहिरीच्या पाठीमागील झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यांचे डोळे चमकताना दिसले आणि आणखी आरडाओरड सुरू झाली. यावेळी काहींनी घरातील फटाके आणून ते वाजवले. फटाक्यांच्या आवाजात बिबट्याला तेथून पळवून लावण्यात आले. मात्र, बिबट्याच्या नादात असतांना उकिरड्यावरील चा-याच्या डाखळाने पेट घेतला आणि म्हणता-म्हणता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. लोकांच्या मदतीने आग काहीशी आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी नगरसूलचे सरपंच प्रसाद पाटील, राजेंद्र पैठणकर, सुनील व-हे यांनी मदत केली. परंतु, आग वाढत चालल्याने येवला येथून अग्निशामक दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली. जवळच कांद्याची चाळ, धान्यासह ट्रॅक्टर व अन्य सामान होते. आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान, बिबट्याच्या पायांचे ठसेही पाहायला मिळाले. त्यामुळे बिबट्याच असण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले असून वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी केली जात आहे.