फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना
By अझहर शेख | Published: November 13, 2023 06:41 AM2023-11-13T06:41:00+5:302023-11-13T06:41:13+5:30
धुमाळ पॉईंटवर तीन तास धुमसली आग; 10 बंबांच्या साह्याने अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न
नाशिक : धुमाळ पॉईंट मुंदडा मार्केट येथे एका जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागली. हवेतून फटाके या ठिकाणी पडल्यामुळे रविवारी 11 वाजून 13 मिनिटाला आग भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालयासह पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड या उपकेंद्रावरील बंबांनादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी 10 बंब पोचले असून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यरात्री वाजेर्यंत आग नियंत्रणात आलेली नव्हती.
रविवारी शहरात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा जल्लोष सुरू असताना अचानकपणे अशोका मार्ग येथे रॉयल टॉवर येथे एक बंद सदनिकेत फटाका शिरल्याने आगीचा भडका उडाला. त्यापाठोपाठ रवींद्र हायस्कूल, द्वारका काठे गल्ली येथे कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात पेटला. यानंतर पदंम ट्रेडर्स दिंडोरी रोड, पंचवटी येथे पुठयाच्या ढिगावर फटाका येऊन पडल्याने आग लागली. सारडा सर्कल येथे मदिना चौकात पत्राच्या शेडवरील अडगळीत असलेले सामानाने फटाका पडल्यामुळे अचानकपणे मोठा पेट घेतला होता. रविवार कारंजा येथे दगडू तेली चांदवडकर दुकानाबाहेर असलेले मंडप फटाक्यामुळे पेटले होते. या सर्व आगीच्या घटना एकापाठोपाठ रात्री 10 वाजेपासून घडू लागल्याने अग्निशमन दलाची धावपळ उडाली. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली.