दिवाळीनंतर फटाक्यांची तपासणी

By admin | Published: October 28, 2016 11:07 PM2016-10-28T23:07:23+5:302016-10-28T23:08:02+5:30

उफराटे प्रशासन : चिनी फटाक्यांची बंदी कागदावरच

Fireworks inspection after Diwali | दिवाळीनंतर फटाक्यांची तपासणी

दिवाळीनंतर फटाक्यांची तपासणी

Next

नाशिक : ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी लादण्याबरोबरच चिनी फटाक्यांवर घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी बहुधा दिवाळीनंतरच होण्याची चिन्हे असून, जिल्ह्यात कायमस्वरूपी फटाक्यांची निर्मिती व विक्री करणाऱ्या कारखान्यांकडून गोळा केलेल्या फटाक्यांची चाचणी करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल दिवाळीनंतरच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात चार व शहरी भागात म्हणजेच पोलीस आयुक्तालय हद्दीत चार असे आठ फटाके विक्री करणारे मोठे दुकानदार असून, त्यातील काही दुकानदारांकडे फटाके निर्मितीचेही परवाने असल्याने या ठिकाणी फटाकेही तयार केले जातात. यंदाही शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी लादली असून, ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवरही निर्बंध आहेत.
या कारखान्यांमधून तयार केले जाणारे तसेच होलसेल विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या फटाक्याच्या साठ्यातील काही निवडक नमुने घेऊन ते विक्रीपूर्वी तपासण्याचा नियम आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठही परवानाधारकांकडून फटाक्यांचे नमुने प्रशासनाने ताब्यात घेतले असून, ते बुधवारी नागपूरला तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
लाखो रुपयांचा निघणार धूर
नागपूरला शासकीय प्रयोगशाळेमार्फत या फटाक्यांची चाचणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात येणार आहे. हाती असलेले दिवस पाहता, शनिवारपासून शासकीय सुट्या असून, थेट बुधवारीच म्हणजे २ नोव्हेंबर रोजीच कार्यालये उघडणार आहेत. या काळात दिवाळी संपुष्टात येऊन लाखो रुपयांच्या फटाक्यांचा धूर निघून जाणार आहे. त्यामुळे आरोग्याला घातक ठरणाऱ्या फटाक्यांवरील बंदी कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Fireworks inspection after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.