फटाक्यांच्या आतषबाजीत प्रचारफेरी
By admin | Published: February 20, 2017 12:15 AM2017-02-20T00:15:19+5:302017-02-20T00:15:41+5:30
प्रचाराची सांगता : शहरातील सर्वच प्रभागात उमेदवारांकडून मतदारांना साकडे
नाशिक : मतदानानंतरचा निकाल काहीही लागो, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रचार रॅलीतच फटाक्यांची आतषबाजी केली. शहरातील अनेक भागात प्रचार रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय प्रत्येक मंदिरासमोर थांबून उमेदवाराने देवाचे दर्शनही घेतले. शहर परिसरात अशाच प्रकारचे चित्र दिसून आले. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांसह अपक्षांनीही प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सकाळपासून परिसरात प्रचार रॅलीच्या घोषणांनी परिसर दाणून गेला होता. सकाळी दहा, अकरा वाजेपासूनच प्रचार रॅलींना सुरुवात झाली होती. रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. हातात पक्षाचा ध्वज, डोक्यावर टोपी आणि गळ्यात पक्षाचा स्कार्प घालून परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, प्रचाराचा रथ आणि त्यावरील प्रचारजिंगल्स असे आवाज एकसारखे येत होते. सकाळी दहा ते दुपारी बारा- एक वाजेपर्यंत उमेदवारांच्या रॅली सुरू होत्या. कार्यकर्त्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी थंडपेय, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख चौक तसेच मंदिर परिसरात आल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते फटाके फोडत होते. जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू होते. कालपासूनच झोपडपट्टी परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुषांना रॅलीचे आमंत्रण देण्यात आले होते. कार्यकर्ते जमविण्याची जबाबदारी असलेल्या कार्यकर्त्यालाही कार्यकर्ते शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. कारण एकाच दिवशी सर्वच उमेदवारांच्या प्रचार रॅली असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी देखील धावपळ झाली. (प्रतिनिधी)