फटाके... काही फुटलेले, काही विझलेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:02 AM2017-10-15T01:02:00+5:302017-10-15T01:07:18+5:30
फटाके हे दिवाळीतच फोडले जात असलेत तरी, राजकारणात ते संधी मिळेल तेव्हा फोडले जातात. विशेषत: निवडणुकांचे निमित्त लाभले की, या फटाक्यांचे आवाज अधिक तीव्र होतात. गेल्या ग्रामपंचायत-सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही ते दिसून आले. यातील निकालाचा आवाज कशा ‘डेसिबल’मध्ये मोजला जातो ू हेच आता पहायचे. कारण त्यावरच अन्य फटाक्यांचे आवाज अवलंबून असतील. तोपर्यंत आजवर एकमेकांना लावल्या गेलेल्या फटाक्यांच्या आवाजाची उजळणी करीत दीपोत्सव साजरा करूया...
किरण अग्रवाल
फटाके हे दिवाळीतच फोडले जात असलेत तरी, राजकारणात ते संधी मिळेल तेव्हा फोडले जातात. विशेषत: निवडणुकांचे निमित्त लाभले की, या फटाक्यांचे आवाज अधिक तीव्र होतात. गेल्या ग्रामपंचायत-सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही ते दिसून आले. यातील निकालाचा आवाज कशा ‘डेसिबल’मध्ये मोजला जातो ू
हेच आता पहायचे. कारण त्यावरच अन्य फटाक्यांचे आवाज अवलंबून असतील. तोपर्यंत आजवर एकमेकांना लावल्या गेलेल्या फटाक्यांच्या आवाजाची उजळणी करीत दीपोत्सव साजरा करूया...
ध्वनी व वायुप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने पर्यावरणवाद्यांनी चालविलेल्या फटाकेमुक्त दिवाळीच्या चळवळीला बºयापैकी यश लाभताना दिसत असले तरी, फटाक्यांशिवाय दिवाळीची कल्पना अजूनही अनेकांच्या पचनी पडत नाही. अर्थात दिवाळीतील फटाकेमुक्ती साधता येणारी असली तरी राजकीय परिघावरील फटाकेबाजी मात्र बारमाही सुरूच असते. पक्षा-पक्षांतच नव्हे तर पक्षांतर्गतही एकमेकांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी फटाके लावले जातात. यातील काही फुटतात, तर काही फुसकेही निघतात. काही फटाके हे दुसºयाच्या अंगणात जाऊन फुटणारेही असतात, तर काही निव्वळ आवाज करणारेच ठरतात. त्याची एक वेगळी गंमत असते. राजकीय दिवाळसण म्हणता यावे त्याला. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील या राजकीय फटाक्यांची चर्चा अप्रस्तुत ठरू नये.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात तरुण फळीने, म्हणजे नवोदितांनी प्रस्थापितांच्या सत्तास्थानांवर सुतळीबॉम्ब लावून संबंधिताना दणका दिल्याचे प्रामुख्याने दिसून आले. यात राजकीय पक्षांनी आमचेच सरपंच जास्त असे म्हणत ‘नंबर गेम’ खेळण्याचा व आपल्या पक्षाचा प्रभाव वाढल्याचे भासविण्याचा प्रयत्नही केला; परंतु ते खरे नाही. कारण, ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाने किंवा पक्षचिन्हांवर लढल्या जात नाहीत. स्थानिक नेतृत्वाच्या संपर्काचे, तेथील गावकीच्या प्रश्नांचे संदर्भ या निवडणुकांना असतात. त्यामुळे पूर्णत: राजकीय चष्म्यातून त्याकडे बघता येऊ नये. पण पक्षाचे लेबल असो नसो, तरुणांनी गावोगावी भल्याभल्यांमागे फटाके लावलेत हे नक्की ! वरिष्ठस्तरीय सत्तेचा वा पक्षाचा प्रभाव ग्रामस्तरावर पडतो या समजाला छेद देणारेही निकाल काही ठिकाणी लागले. अगदी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या दाभाडीसह लगतच्या काही गावांमध्ये सत्तांतरे घडून आली. यात भुसे व अद्वय हिरे यांच्यातील राजकीय शह-काटशहची सुरसुरी बºयापैकी पेटल्याचे दिसून आले, त्यामुळे दिवाळीनंतरचे राजकारण अधिक प्रकाशमान झालेले दिसून येण्याची शक्यता आहे. पिंपळगाव (ब.) या राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक गावात गेल्या ३२ वर्षांपासूनची ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांची सत्ता उलथवून माजी आमदार दिलीपराव बनकर यांनी दिवाळी साजरी केली. आज पिंपळगावमध्ये पेटून फुटलेला राजकीय फटाका शेजारी ओझरच्या अंगणात आला तर त्याचा आवाज आगामी विधानसभा निवडणुकीत ऐकू येण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. दिवाळीपूर्वी फुटलेले फटाके दिवाळीनंतरच्या राजकारणावर परिणाम करण्याचे आडाखे बांधले जात आहेत ते याचसंदर्भाने.
नाशिक महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही व सुमारे आठेक महिने उलटूनही स्वीकृत सदस्य नेमणुकीचा निर्णय करता आलेला नाही. काही नावे निश्चितीच्या यादीत असताना आमदार देवयानी फरांदे यांनी त्यास फटाका लावला आहे. नेत्यांच्या आप्तेष्ठांनाच का संधी द्यायची, पक्षासाठी काम करणाºया; परंतु निवडून येऊ न शकणाºया सामान्य कार्यकर्त्यास ती संधी द्यावी, अशी अतिशय योग्य भूमिका यामागे असली तरी यासंबंधीचा फटाका अजून फुटायचा आहे. फरांदे यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून नेत्यांच्या गणगोतालाच त्यासाठी पसंती दिली गेली तर त्यातून पक्षांतर्गतच फुटणाºया फटाक्यांचे आवाज अधिक कानठळ्या बसविणारे आणि पक्षाच्या तथाकथित प्रभावाच्या पडद्याला बाधा आणणारेच ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेत तर सर्वपक्षीय सत्तेचे चित्र असल्याने प्रत्येकाच्याच हाती फटाके आहेत. मिळाली संधी की फोड फटाका, असे तिथे सुरू असते. अध्यक्ष शिवसेनेच्या, उपाध्यक्ष काँग्रेसचे, तर सभापती अन्य पक्षांचे; त्यामुळे परस्परांना आडवे जाण्यात व निधीचे ‘रॉकेट’ या खात्यातून त्या खात्यात वळविण्याचे प्रयत्न करण्यातच वेळ जातो आहे. शिवसेनेला काम करू द्यायचे नाही म्हणून जिल्हा परिषदेचा कोट्यवधींचा निधी जलयुक्त शिवार योजनेकडे वर्ग करण्याचा फटाका या राजकीय फटाकेबाजीतूनच फोडण्यात आल्याची चर्चा त्यामुळेच जोर धरून आहे. अर्थात, अद्याप नव्यांची नवलाई सरलेली नाही. अनेक प्रश्नांच्या, कामांच्या व निधीच्या विनियोगातून आकारास आलेल्या मतभिन्नतेच्या वाती पेटल्या असल्या तरी फटाके फुटायचे आहेत. सर्वांचीच दिवाळी साजरी न होता, काही मोजक्याच अंगणात दीपोत्सव साजरा होईल तेव्हा हे फटाके फुटतील.
राजकीय पक्षांच्या बाबतीत म्हणायचे तर, तिकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपाचा उधळलेला वारू रोखून धरला म्हणून इकडे नाशकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडले व पेढे वाटलेत; परंतु या पक्षातील परस्पर विरोधाचे जे लवंगी फटाके नेहमी फुटताना दिसतात त्याचा आवाज पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचतच नाही. आता या पक्षात पक्ष पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळात कोण कुणाला फटाके लावतो हे पहावयास मिळेलच. राष्ट्रवादीत भुजबळांनंतर नाशिकचे नेतृत्व ठाणेकर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविले गेले होते; परंतु त्यांना पक्षातील दिवाळीची स्थिती कायम राखता आली नाही. अखेर पक्षानेच त्यांच्या जागी जयंत पाटील यांना निरीक्षक म्हणून धाडले. जयंतराव तसे नेमस्त. नाशकातील पक्षाचे नेते व कार्यकर्ते हे मात्र गटागटांत विभागले गेलेले. त्यातही अटकेत जावे लागलेल्यांचे काही धक्के या पक्षाला बसलेले. त्यामुळे विखुरलेले ‘लवंगी’ वेचून वेचून एकत्र करणे व त्याची ‘लड’ करून पक्षाच्या प्रभावाचा बार उडविणे हे वाटते तितके सहज सोपे नाही. शिवसेनेतही यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही. अजय-विजयची जोडी चांगली जमलेली असली तरी निष्ठावंतांचा गट अधून-मधून फटाके फोडतच असतो. बरे, शिवसेनेत संपर्कप्रमुख बदलाचे प्रयोग सातत्याने सुरूच असतात. त्यामुळे एखादा विझलेला फटाका, त्याची वात गेलेली असली तरी दुसºया एखाद्या मोठ्या फटाक्याच्या साक्षीने फोडण्याचा प्रयत्न केला जातो तसा पक्ष-संघटनेतून अंतर्धान पावलेला कुणी केव्हा कुणाचे बोट धरून ‘मातोश्री’वर जाऊन येईल याचा भरवसा नसतो. पण फटाक्यांच्या आवाजातच काम करण्याची सर्वांना सवय जडलेली असल्याने साºयांचे निभावून जाते. भाजपात शहराध्यक्षाला समांतर शह देणारे फटाके अन्य दोघा आमदारांकडून वेळोवेळी फोडले जातातच. ‘मनसे’च्या फटाक्यांच्या वाती आजवर सादळलेल्या होत्या. परंतु अलीकडील मुंबईतील मोर्चानंतर त्यात धुगधुगी आल्याचे दिसत आहे. गल्लीत आवाज होवो न् होवो, आसमंतात आवाज झाला तरी त्याआधारे मैदान मारण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे यापुढील काळात कुणाचे फटाके कसे फुटतात ते औत्सुक्याचे ठरले आहे.
याहीखेरीज गेल्या वर्षात नाशिक बाजार समितीत शिवाजीराव चुंभळे यांनी लावलेला फटाका फुटला आणि देवीदास पिंगळे यांचे संस्थान खालसा झाले; पण जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी लावण्यात आलेले फटाके निकामी ठरल्याचे दिसून आले. नाशिकहून विमानसेवेचा बारही फुसका ठरला. खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी संबंधितांच्या अंगणात अनेकविध रांगोळ्या रेखाटल्या. पण अखेर विमानोड्डाणासाठी आंदोलनाचा इशारा देणारा फटाकाच हाती घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशा राजकीय फटाकेबाजीने नाशिक जिल्ह्याचे आसमंत व्यापून राहिले असले तरी, अराजकीय वैराचे प्रदूषण त्यातून ओढावलेले नाही हे सुदैव!