सेवानिवृत्त सुभेदाराकडून हवेत गोळीबार
By admin | Published: June 2, 2017 01:11 AM2017-06-02T01:11:06+5:302017-06-02T01:11:19+5:30
देवळाली कॅम्प : पंचरत्न रेणुकामाता सोसायटी येथे सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : रेस्ट कॅम्परोडवर असलेल्या पंचरत्न रेणुकामाता सोसायटी येथे सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ याने पत्नी व मुलाजवळ आपल्या प्रेमसंबंधाचे असलेले पुरावे मागितले असता त्यांनी नकार दिल्याचा राग येऊन त्याने गॅलरीमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुकामाता सोसायटी पंचरत्नमध्ये ऋषिकेश विलास बारगळ हा आपल्या आईसह राहतो. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ऋषिकेश व त्याची आई घरी असताना वडील सेवानिवृत्त सुभेदार विलास बारगळ घरी आले. त्यांनी पत्नी व मुलाकडे आपल्या प्रेमसंबंधाचे रेकॉर्ड केलेले पुरावे, मोबाइल फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड देण्याची मागणी केली. पत्नी व मुलाने पुरावे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माजी सुभेदार विलास याने आपल्या जवळील परवानाधारक बंदूक पत्नी व मुलाला दाखवून गोळी झाडून मारून टाकेल, अशी धमकी देत गॅलरीत जाऊन आकाशाच्या दिशेने हवेत एक गोळी झाडली.
यामुळे परिसरात भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ऋषिकेश बारगळ याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून असून पुढील तपास उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे हे करीत आहे.