वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार
By admin | Published: August 20, 2016 01:12 AM2016-08-20T01:12:19+5:302016-08-20T01:24:06+5:30
दोन जखमी : पत्नी आणि मित्रावर झाडल्या गोळ्या; घरगुती भांडणातून घडला प्रकार
इंदिरानगर : घरगुती भांडणातून पतीने आपल्या पत्नीसह मित्रावरही गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित पतीस पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक परदेशी (वय ३०, रा. साईराम रो-हाउस, पाथर्डी शिवार, म्हाडा कॉलनीजवळ याने आपला मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (वय ४३, रा. माडसांगवी) यास वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी बोलविले होते. दोघा मित्रांनी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर नागेश्वर हा आपल्या घरी जाण्यास निघाला असतानाच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दीपक आणि त्याची पत्नी कोमल यांच्यात भांडण झाले. भांडण वाढत गेल्यानंतर दीपकचा राग अनावर झाला. त्याने आपल्याजवळील गावठी कट्टा काढून त्यातून कोमलवर गोळी झाडली. यावेळी नागेश्वर हा कोमल हिला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता दीपकने त्याच्यावरही दोन गोळ्या झाडल्या.
या घटनेने भयभीत झालेला नागेश्वर स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करीत घराबाहेर पडला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी जखमी नागेश्वर आणि कोमल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर मात्र दीपक फरार झाल्याने पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेऊन सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेण्यात आले. (वार्ताहर)