पिस्तुलने गोळीबार : साडेतीन लाख रूपयांची रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:37 PM2019-03-30T22:37:12+5:302019-03-30T22:42:31+5:30
नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ...
नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी पिस्तुलने गोळीबार करत व्यापाऱ्याची जबरी लूट केल्याची घटना घडली. व्यावसायिकाच्या हातातील साडेतीन ते पावणेचार लाख रूपयांची रोकडची बॅग हल्लेखोरांनी शनिवारी (दि.३०) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास लांबविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साधुवासवानी रस्त्यावरील कुलकर्णी गजानन स्मृती अपार्टमेंटच्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे विराग चंद्रकांत शाह (३८) हे गोळे कॉलनीमधील त्यांच्या पुनम एन्टरप्रायजेस या होलसेल वैद्यकिय साहित्य विक्रीचे दुकान आटोपून दुचाकीवरून घरी आले. यावेळी त्यांचा पाठलाग करत एका स्पोर्टसबाईकवरून तीघे युवक आपर्टमेंटच्या वाहनतळापर्यंत आले. त्यावेळी तीघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल (एअर गन) रोखून फायर केले. यामुळे शाह घाबरून वाहनतळातून जिन्याकडे पळताना पडले. त्यांच्या हातातून दोघा हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावून तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. यावेळी ज्याच्या हातात पिस्तुल होते तो वाहनतळातून चालत बाहेर आला. यावेळी समोरील बंगल्यावरील वॉचमन सुभाष कारगोडे हे घराबाहेर धावत आल्याने त्याने त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून दम भरला यामुळे सुभाष यांनी घाबरून बंगल्यातील मोटारीमागे लपले. त्यावेळी तीसरा हल्लेखोर दोघा साथीदारांच्या सोबत दुचाकीवर बसून फरार झाला.
या घटनेनंतर विराग यांनी तत्काळ घरी जाऊन सर्व प्रकार सांगत पोलीस नियंत्रण क क्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे, सोमनाथ तांबे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहनतळाचा संपुर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला; मात्र रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे गावठी कट्टयाने झालेल्या गोळीबाराचे कुठलेही पुरावे वाहनतळाच्या परिसरात आढळून आले नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी ‘एअर गन’चा धाक दाखवून आवाज करत जबरी लूट केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.