आधी फटाके फोडा, मग ऊसतोड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:36 AM2019-12-20T01:36:28+5:302019-12-20T01:39:31+5:30
आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले.
नाशिक : आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले. याबाबतची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला मिळताच वनअधिकारी, कर्मचाऱ्यांनी ऊसशेतीचा बांध गाठला. ‘आधी फटाके फोडा, मग ऊसतोडणी करा...’ असा सल्ला देत दिवसभर ऊसतोड कामगारांसोबत पहारा दिला.
बिबट्याच्या पाऊलखुणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या ऊसशेतीच्या परिसरात आठवडाभरापूर्वीच आढळून आल्या होत्या. यामुळे या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याने बांधालगत पिंजरादेखील तैनात करण्यात आला; मात्र गुरुवारी सकाळी बिबट्याचे बछडे येथील काही शेतमजुरांना दिसल्याने वनविभागाचे वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांशी चर्चा करत बछडे दिसल्याची खात्री पटविली. त्यानंतर काही फटाके फोडून ऊसतोड कामगारांना ऊस कापण्यास सांगितले. दुपारी ४ वाजेपर्यंत वनकर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून होते; मात्र ऊसतोड सुरू झाल्यानंतर कोयत्यांचा येणारा सपासप आवाज आणि नागरिकांची वर्दळ यामुळे बिबट मादीने आपल्या बछड्यांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असावे, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. निम्म्यापेक्षा अधिक ऊसतोड करावयाची आहे. शुक्रवारी (दि.२०) पुन्हा ऊसतोडीला प्रारंभ केला जाणार आहे.
पिंजºयाचा दरवाजा बंद; ट्रॅप कॅमेरा सुरु
वनअधिकारी व कर्मचाºयांनी गुरुवारी संध्याकाळी पुन्हा बांधावर धाव घेतली. येथे लावण्यात आलेल्या पिंजºयाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. जेणेकरून या पिंजºयात बिबट मादी किंवा तिचे बछडे जेरबंद होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. कारण बछडे जेरबंद झाले तर मादी आक्रमक होऊन जवळच्या मानवी वस्तीजवळ धोका पोहचवू शकते. तसेच मादी जेरबंद झाली तर पिल्लांची उपासमार होऊ शकते, त्यामुळे वनअधिकाºयांनी हा निर्णय घेतला. बिबट मादी, बछडे यांच्या हालचाली टिपण्यासाठी संध्याकाळी ऊसशेतीच्या बांधावरच ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला.