नारायण राणेंविरुद्ध राज्यात पहिला गुन्हा नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:39+5:302021-08-25T04:19:39+5:30
गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करणे आवश्यक असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. ...
गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करणे आवश्यक असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. त्यांनी गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाची यासाठी निवड करत पथकप्रमुख म्हणून गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना रवाना केले आहे. राणे यांना दुपारी रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि जवळच्या पोलीस ठाण्यात हलविण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचा दावा पाण्डेय यांनी केला आहे. दरम्यान, दुपारी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या दिंडोरी पोलीस ठाण्यातही शिवसैनिकांच्या तक्रारीवरून राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--इन्फो---
केंद्रीय मंत्रीपदाचे सर्व प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपती यांना तत्काळ देण्यात यावी, असे आदेशही नाशिकच्या पोलीस पथकाला देण्यात आले.
पाण्डेय यांनी काढलेल्या या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, गुन्ह्यातील संशयित आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेचे सदस्य असल्याने त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. यामुळे बारकुंड यांना नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळविण्याची सूचना करण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले. तसेच याशिवाय इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार, राज्यस्तरीय गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, महाराष्ट्र शासन व संबंधित जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकाऱ्यांना नारायण राणे यांच्या अटकेची माहिती द्यावी, असेही पथकाला सांगितले गेल्याचा दावा पाण्डेय यांनी केला आहे.
---इन्फो--
दोन्ही पक्षांकडून कायद्याचे उल्लंघन
दरम्यान, मंगळवारी सकाळी राणे यांच्या विधानाने पडसाद उमटून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या एन.डी. पटेल रोडवरील वसंतस्मृती या पक्षाच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करून घोषणाबाजी केली. सदरचे वृत्त भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर भाजपाचा एक गट शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी सज्ज झाला. यावेळी कालिदास कलामंदिरासमोर दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आल्याने पळापळ झाली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनाही या आंदोलकांनी जुमानले नाही. यामुळे रात्री उशिरापर्यंत या भागात तणावपूर्ण शांतता होती.