चापडगाव जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव !

By admin | Published: February 4, 2017 12:54 AM2017-02-04T00:54:12+5:302017-02-04T00:54:25+5:30

नाशिक विभाग : एटीएम कार्डचे वितरण; महाराष्ट्र बॅँकेच्या पुढाकाराने केली जनजागृती

The first cashless village in the district of Chapadgaon! | चापडगाव जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव !

चापडगाव जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव !

Next

 नांदूरशिंगोटे (नाशिक) : अति डोंगराळ भाग तसेच मोबाइलची रेंज कमी असताना महाराष्ट्र बॅँकेचा पुढाकार व ग्रामस्थांची मानसिकता याद्वारे चापडगाव हे गाव नाशिक महसूल विभागातील पहिले कॅशलेस गाव ठरले असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी काढले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एटीएम कार्ड व क्युआर कोड ग्रामस्थांना वितरित करण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्यासह निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, महाराष्ट्र बॅँकेचे उपविभागीय व्यवस्थापक वसंत पाटील, बॅँक अधिकारी अशोक चव्हाण, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, शाखा व्यवस्थापक रवींद्र तनपुरे आदि उपस्थित होते.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य दिले जावे यासाठी शासन स्तरावरून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कॅशलेस गाव त्याच उपक्रमातील एक भाग आहे. दापूरच्या महाराष्ट्र बॅँकेच्या शाखेने राबविलेल्या कॅशलेस गाव उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नाशिक महसूल विभागातील चापडगाव हे पहिले गाव ठरले असून, त्यामुळे गावाची जबाबदारी वाढली आहे. दुर्गम भागात गावात अडचणी असून सुद्धा गाव कॅशलेस केले याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट व इच्छाशक्ती पाहून जिल्हाधिकारी प्रभावित झाले.
दापूर शाखेने केलेल्या कामांची प्रशंसा करून इतर सर्व बॅँकांनी हा आदर्श घेऊन कमीत कमी एक गाव कॅशलेस करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केले. नाशिक महसूल विभागातील शंभर टक्के गाव कॅशलेस करण्याचा हा यशस्वी उपक्रम असून, त्याची सुरुवात येथून झाली आहे. गावातील
मोबाइल रेंजची अडचण आहे, याबाबत संबंधित विभागाशी तत्काळ संपर्क साधून अडचण दूर केली जाईल. कॅशलेस गाव ही ओळख कायम टिकवण्यासाठी दक्ष रहावे लागले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दापूरचे शाखा व्यवस्थापक रवींद्र तनपुरे व बॅँकमित्र मोतीलाल सांगळे यांनी यशस्वी उपक्रम केल्याबद्दल त्यांच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनेक वृद्ध शेतकऱ्यांना बॅँकेच्या व्यवहारासाठी दापूरला जावे लागत होते. तो त्रास आता वाचला असून, आधारकार्डद्वारेच आता ते व्यवहार करतात. गावातील चार दूध डेअऱ्यांना कॅशलेस सुविधा दिल्याने आता डे्ररीत दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ दुधाच्या विक्रीची रक्कम मोबाइलद्वारे मिळत आहे. कृषिसेवा केंद्रासही ही सुविधा जोडल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशकांची सोय आता गावातच झाली आहे. १५ किराणा दुकानदारांचा व्यवहारही कॅशलेस झाला आहे. यावेळी अशोक चव्हाण, के. पी. आव्हाड, रवींद्र तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दत्तोपंत सांगळे, कोंडाजी आव्हाड, समाधान सांगळे भाऊसाहेब सांगळे, सतीश आव्हाड, अनिल सांगळे, जालिंदर सांगळे, गोरक्ष सांगळे, शिवाजी आव्हाड, मंगेश गोसावी, रोहित बुचकूल, जालिंदर थोरात, सचिन पठाडे, योगेश भवर, नीलेश गलांडे, विलास मेंगाळ, प्रभाकर उघडे, कैलास तांबे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवाळे यांनी सूत्रसंचालन, तर स्वप्नील चौरे यांनी आभार मानले. सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथे ग्रामस्थांना एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महेश पाटील, वसंत पाटील, अशोक चव्हाण, मनोजकुमार खैरनार, रत्नाकर पगार, रवींद्र तनपुरे आदि.

Web Title: The first cashless village in the district of Chapadgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.