७ हजार ९८८ विद्यार्थ्यांनाच प्रथम पसंतीचे महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:02+5:302021-08-28T04:20:02+5:30
नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली गुणवत्ता यादी ...
नाशिक : महापालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. २७) सकाळी जाहीर झाली आहे. यात १६ हजार २०८ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८५० विद्यार्थ्यांची निवड झाली असून ७ हजार ९८८ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. यावर्षी अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेचा टक्का उंचावलेला असताना एचपीटी कला महाविद्यालयाच्या कटऑफ ७९.९, आरवायकेतील विज्ञान ९०.४ टक्के व बीवायके कॉमर्सचा ९०.२ टक्क्यांचा कटऑफ जाहीर झाला आहे. तर केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेचा ९१. ८, कॉमर्स ८७, ९ तर कला शाखेचा ७४.२ टक्क्यांवर कटऑफ जाहीर झाला आहे. दरम्यान, पहिल्या यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.
नाशिक शहरातील ६० उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार ३८० जागा उपलब्ध असून याकरिता विद्यार्थ्यांकडून २२ हजार ९९९३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यातील २० हजार ३६२ विद्यार्थ्यांनी अर्जांची पडताळणी केली होती. त्यातील १६ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडले होते. त्यातील ११ हजार ८५० विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली आहे. मात्र केवळ ७ हजार ९८८ विद्यार्थ्यांनाच प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्यासाठी दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---
पहिल्याच दिवशी १२३४ प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी शुक्रवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर तत्काळ प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली असून प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी १२३४ मुलांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. प्रथम गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार असून ३१ ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
---------
प्राधान्यक्रमनिहाय विद्यार्थी
प्रथम प्राधान्य : ७ हजार ९८८
दुसरा प्राधान्य : १ हजार ५८५
तिसरा प्राधान्य : ८६९
चौथे प्राधान्य : ५३६
पाचवे प्राधान्य : ३२४
---------
शाखानिहाय तपशील
शाखा - उपलब्ध जागा - आलेले अर्ज - प्रथम फेरीत संधी
कला - ४१४० - २१४२ - १७९०
वाणिज्य - ७०५६ - ५७०४- ४१९९
विज्ञान - ८५९४ - ८२४७ - ५७५३
एचएसव्हीसी - ११३९ - ११५ - १०८
----------