‘सीपीटी’मध्ये ‘फर्स्ट क्लास’ : दृष्टीहीन नाशिकच्या वेदांतचे सीए होण्याचे स्वप्न झाले प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 09:30 PM2018-01-17T21:30:04+5:302018-01-17T21:45:00+5:30
अझहर शेख, नाशिक : येथील रहिवासी असलेला वेदांत उमेश मुंदडा या विद्यार्थ्याने दहावी, बारावीच्या परिक्षेप्रमाणेच आपल्या यशाची उज्ज्वल कामगिरीमध्ये सातत्य राखून सीपीटीच्या परिक्षेत ‘फर्स्ट क्लास’ मिळविला आहे. तो भारतासह अन्य पाच देशांमधील परिक्षार्थ्यांमध्ये एकमेव दृष्टीबाधित विद्यार्थी होता
नियतीने जरी वेदांतच्या झोळीत अंधत्व टाकले असले तरी त्याला तल्लख बुध्दीमत्ता प्रदान केली आहे. यामुळे वेदांतची यशोशिखराची वाट प्रकाशमान झाली आहे.
सनदीलेखापाल (सीए) परिक्षेला पात्र होण्यासाठी द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटन्टस् आॅफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीपीटीच्या परिक्षेत वेदांतने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यात यश मिळविले. चार विषयांचे पेपर देत त्याने एकूण २०० गुणांच्या परिक्षेत एकूण १३५ गुण मिळविले. फंडामेंटल अकौंट विषयात त्याला सर्वाधिक ६० पैकी ४५ गुण मिळाले आहे. एकूणच वेदांतचे सीए होण्याच्या स्वप्नाची मुख्य वाट या परिक्षेच्या चमकदार यशाने प्रकाशमान झाली आहे.
विशेष म्हणजे नेपाळ, दुबई, मस्कद व अबुधाबी या सर्व देशांमध्ये सीपीटीची परिक्षा पार पडली; मात्र यावर्षी दृष्टिबाधित श्रेणीत एकही परिक्षार्थी परिक्षेसाठी कुठल्याही देशामध्ये प्रविष्ट झाला नव्हता. केवळ भारतात महाराष्टमधील नाशिक जिल्ह्यातून वेदांतच्या रुपाने एकमेव दृष्टिबाधित परिक्षार्थी सीपीटीची परिक्षा देत होता.
सीपीटी परिक्षेचा अभ्यास करताना वेदांतला ब्रेल भाषेत कुठलेही पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. वेदांतने केवळ श्रवणशक्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर आपल्या जीद्दीने सीपीटीचा अभ्यास करत यश मिळविले आहे. वेदांत हा दहावी व बारावीच्या परिक्षेत दृष्टिबाधितांमध्ये राज्यात टॉपर ठरला होता.
सरकार अन् समाजाने आमच्यावर विश्वास दाखवावा
दृष्टीबाधित विद्यार्थ्यांवर सरकार व समाजाने विश्वास दाखविणे काळाची गरज आहे. तरच आम्ही मुख्य प्रवाहात येऊ शकू. आमच्यातही क्षमता आहे, स्वत:ला सिध्द करण्याची. सीए होण्याचे माझे स्वप्न आहे, आणि त्यामुळेच ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतानाही मी केवळ तो अभ्यासक्रम ऐकून शिकला. यासाठी मला खूपच त्रास झाला. सरकारने ब्रेल लिपितून सीएसारख्या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून दृष्टीबाधित विद्यार्थीदेखील सीए होण्याचे स्वप्न बघू शकतील.
- वेदांत मुंदडा
केवळ अभ्यासातच नव्हे तर संगीतातही ‘मास्टर’
वेदांत हा अभ्यातच हुशार आहे असे मुळीच नाही, तर वेदांत हा दृष्टिबाधित असूनही उत्तम क्रिकेटरही आहे आणि त्याने संगीताने आपल्या व्यंगावरही मात केली आहे. हार्मोनियम, बासरी, सिंथेसायझर तो उत्तमरित्या हाताळतो. तबल्यातही त्याने उत्कृष्ट वादकाची भूमिका बजावली असून गंधर्व महाविद्यालयात तो तबला विशारदाचे धडेही गिरवत आहे. वेदांत बदलत्या काळाबरोबर स्वत:ला ही बदलत असून त्याने आधुनिकतेशीही आपले नाते जोडले आहे. तो उत्तमरित्या स्मार्टफोनचा वापर करत सोशल मिडियावरही सक्रिय असतो