पहिला दिवस ‘कोरडाच’
By admin | Published: February 2, 2017 01:59 AM2017-02-02T01:59:04+5:302017-02-02T01:59:17+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्णात ७३ गट व १४६ गणांसाठी आॅनलाइन अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत नेमके किती अर्ज आले याची माहिती जिल्हा स्तरावरून गोळा करण्याचे काम सुरू होते. प्रत्यक्षात जिल्ह्णासाठीही प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाटी कोरीच राहिली. येत्या तीन तारखेला शिवसेना-भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास घाईगर्दी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उमेदवारांना थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सहा फेबु्रवारीला पक्षाचे ए.बी. फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांसाठी १ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ७ फेब्रुवारीला छाननी तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल बुधवारी (दि.१) पहिल्याच दिवशी नाशिक तालुक्यातील आठ गण व चार गटांसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. जिल्ह्णात आॅनलाइन अर्ज दाखल झाले असले तरी प्रत्यक्षात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. पदवीधर मतदारसंघाच्या मतदानानंतर ३ फेब्रुवारीनंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)