निफाड तालुक्यातील शाळांचा पहिला दिवस ’थंडा थंडा कूल कूल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:12 PM2020-06-15T21:12:05+5:302020-06-16T00:00:40+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचने वाढल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने शाळेचा पहिला दिवस ‘थंडा थंडा कूल कूल’ गेल्याचे दिसून आले. शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांअभावी शाळांचे प्रांगण सुने सुनेच होते.
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचने वाढल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने शाळेचा पहिला दिवस ‘थंडा थंडा कूल कूल’ गेल्याचे दिसून आले. शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांअभावी शाळांचे प्रांगण सुने सुनेच होते.
निफाड तालुक्यातील शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी न येता शाळेत किमान एका शिक्षकाने उपस्थित राहावे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना द्यावयाची पाठ्यपुस्तके अद्याप पूर्णत: प्राप्त झालेली नसल्याने ही पुस्तके प्राप्त होताच तातडीने वितरित केली जातील, अशी माहिती निफाड तालुका प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी दिली.
शाळा सुरू होणार असल्यातरी शासन निर्णयानुसार विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, असेही तुंगार यांनी सांगितले.
----------------------
दिंडोरी तालुक्यातील
प्राथमिक शाळाही विद्यार्थ्यांविना
दिंडोरी : कोविड १९च्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने फुलणारी शालेय विद्यार्थ्यांची बाग यंदा फुललीच नाही. सर्वच शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असूनही शांतता होती. दरवर्षी होणारे नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे स्वागताचे कार्यक्र म कुठेही घेण्यात आले नाहीत. प्रशासनाकडून प्राप्त झालेले नवीन पाठ्यपुस्तके घेण्यासाठी पालक तुरळक प्रमाणात शाळांमध्ये उपस्थित होते. शाळेत कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स राखून वितरण करण्यात आले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी घरोघरी जाऊन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत होते. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना महत्त्वाच्या कामाशिवाय शाळेत बोलवू नये, असे लेखी आदेश संस्थाचालकांचे दोन दिवस आधीच प्राप्त झाले होते तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना असे कुठलेही स्पष्ट लेखी आदेश देण्यात आलेले नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये द्विधामन:स्थिती होती. अनेक शाळांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आलेली असली तरी जन्माचा दाखला देऊन शाळा प्रवेश निश्चित करणे आवश्यक असतानाही इयत्ता पहिलीच्या वर्गात नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांना दाखल करण्यात उदासीनता दिसून आली. काही शिक्षक मात्र दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेताना दिसून आले.
---------------------------
विद्यार्थ्यांविना शाळेचे अंगण सुने सुने
ब्राह्मणगाव : नव्या शैक्षणिक वर्षाला १५जूनपासून प्रारंभ होतो. मात्र, यंदा कोरोनाच्या दहशतीमुळे व लॉकडाऊन सुरू असल्याने शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांविनाच सुना सुना गेला. शिक्षकांनी मात्र हजेरी लावली.
एरव्ही उन्हाळी सुटी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र कोरोनाच्या धाकाने यंदा एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नाही. तर शासन आदेशामुळे सर्वच शिक्षक आपापल्या वर्गात उपस्थित होते.
ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरु वात केली आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्ती कामकाजानिमित्त घराबाहेर पडली आहे. मात्र लहान मुलांना सांभाळणे महत्त्वाचे आहे.
पालकही जागरूक असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शक्य असेल तेथे शाळास्तरावरून पाठ्यपुस्तके वितरण करत आॅनलाईन शिक्षण देण्यावर भर दिला आहे.
--------------------------
शाळा उघडल्या; परिसर मात्र सुना सुना...
सायखेडा : ‘आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जसा माउली बाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरु वात १५ जूनला होत असते. मात्र, यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले ते विद्यार्थ्यांविना. उन्हाळी सुटीनंतर सुरू होणारी शाळा दरवर्षी १५ जूनला भरत असते. शाळेचा पहिला दिवस हा शिक्षकांच्या धावपळीने व विद्यार्थ्यांचे किलकिलाटाने सुरू होत असतो. उत्सवाच्या तयारीने शालेय परिसर हा सजवण्यात येतो. प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने गावातून नवीन विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. त्यासाठी सजवलेला रथ ढोल-ताशांचा पथक यांचे विशेष आकर्षक ठरते. मुलांना गावातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात येते. गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळतात. यंदा मात्र सर्वच सोहळ्यावर कोरोनामुळे विरजण पडले आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक साफसफाई तसेच इतर माहितीच्या संकलनासाठी आले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजणारी शाळा शांत भासत होती. जून महिना सुरू झाला की शाळेची ओढ लागते. नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तके सर्व काही नवीन अनुभवायला मिळते.
यंदा मात्र शाळेची खूप ओढ लागली आहे. पण खबरदारी म्हणून शासनाने शाळा बंद केले असल्याने शाळेत जाता आले नाही. कोरोना लवकर हद्दपार व्हावा आणि आम्हा विद्यार्थ्यांना लवकर शाळेत जायची संधी मिळावी यासाठी देवाकडे साकडे घालत आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी आर्या कमानकर हिने दिली.