पहिल्याच दिवशी विविध विभागांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:13+5:302021-09-16T04:20:13+5:30
नाशिक : राज्य विधिमंडळाच्या अंदाजपत्रक समितीने मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ...
नाशिक : राज्य विधिमंडळाच्या अंदाजपत्रक समितीने मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत नियोजन आणि विलंबाबाबत समितीने काही आक्षेप नोंदविल्याचे वृत्त आहे. याबाबतचा अधिकृत दुजाेरा मिळू शकला नसला तरी समितीने स्मार्ट सिटीमध्ये झालेल्या वाळू उत्खननाबाबत अनेक मुद्ये उपस्थित केल्याने बराच गदारोळ झाल्याचे समजते.
राज्य विधिमंडळ अंदाजपत्रकीय सदस्यांचे सोमवारी सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे काही विभागांचा आढावा घेण्यात आला. सकाळी अकरा वाजता बैठका सुरू झाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. सरकारी योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा शासकीय विभागांनी कशाप्रकारे विनियोग केला याची माहिती प्रामुख्याने समिती घेत असल्याने पहिल्याच दिवशी समितीने याबाबतीत काही विभागांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये प्राधान्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामकाजाबाबत प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. पूर्णत्वास आलेली कामे, सुरू असलेली तसेच कोणत्या कामांना विलंब होत आहे याची माहितीही यावेळी समितीने घेतली.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात अनेक मोठी कामे सुरू असून, कोणते प्रोजेक्ट पुढील टप्पयात आहेत याबाबतचा देखील आढावा घेण्यात आल्याचे कळते. स्मार्ट सिटीच्या कामकाजाच्या वाढत्या खर्चाबाबत समितीने काही प्रश्न उपस्थित केले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आणखी काही विभागांचा आढावा घेतल्यानंतर समितीच्या सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन तेथील वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये जे वाळू उत्खनन झाले त्याबाबत समितीने अनेक महत्वाचे मुद्ये उपस्थित करीत प्रश्नांचा भडीमार केला. यावरून बराच गदारोळ झाल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, अंदाजपत्रकीय समिती तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असल्याने बुधवारी ग्रामीण भागातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणीदेखील केली जाण्याची शक्यता असून, जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.