जि.प.ची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ‘व्हीसी’द्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:37 PM2020-06-15T17:37:02+5:302020-06-15T17:38:23+5:30
दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दर तीन महिन्यांनी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १५) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडक पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून या सभेत सहभागी नोंदविला, तर अनेकांनी घरातून व काहींनी तालुक्याच्या पंचायत समितीतील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेत सहभागी झाले. जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्यांदाच केलेल्या या प्रयत्नात अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने काही सदस्यांनी आवाजाच्या तर काहींना रेंज मिळत नसल्याने संवाद साधण्यात वारंवार व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी केल्या, तरीही जवळपास चार तास चाललेल्या या सभेत अनेक विषयांवर चर्चा होवून जवळपास पदाधिकारी, सदस्य व अधिकारी मिळून ७५ जण या सभेत सहभागी झाले.
जिल्हा परिषदेची मागील अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा १६ मार्च रोजी घेण्यात आली, त्यानंतर मात्र अवघ्या आठवडाभरातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन, संचारबंदी जारी केल्याने जिल्हा परिषदेचे कामकाजही जवळपास दीड ते दोन महिने ठप्प झाले होते. या काळात प्रशासनाकडून मात्र आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवांवर लक्ष केंद्रित करण्यात आले तर या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्थायी समिती व विषय समित्यांच्या मासिक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले. सोमवारच्या सभेसाठी प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपल्या निवासस्थानातूनच अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी हजेरी लावली, तर उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, कृषी सभापती संजय बनकर यांच्यासह उदय जाधव, दीपक शिरसाठ, सिद्धार्थ वनारसे, यतीन पगार यांनी जिल्हा परिषदेत येऊन सहभाग नोंदविला. यावेळी प्रारंभी अनेक तांत्रिक कारणांमुळे सदस्यांना संवाद साधण्यात अडचणी आल्या. भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याच्या कारणाने सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या पॅसेजमध्ये येत सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभागृहात सुरक्षित अंतर पाळत सहभाग नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातून सहभागी झाले, तर अन्य खातेप्रमुखांनी आपापल्या कार्यालयातून सहभागी झाले. ग्रामीण भागातील अन्य सदस्यांनी त्या त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयातून सभेस हजेरी लावली. तांत्रिक कारणे दर्शविली गेली असली तरी, सभेच्या अजेंड्यावर असलेल्या २८ विषयांना मंजुरी देण्यात आली, शिवाय ५६ सदस्य व अधिकाऱ्यांसह जवळपास ७५ जण यात सहभागी झाले.