अभिमानास्पद... आबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराला लाभला कुंभनगरीचा हात
By Suyog.joshi | Published: February 20, 2024 12:22 PM2024-02-20T12:22:56+5:302024-02-20T12:23:50+5:30
अभिमानास्पद : नाशिकचे वास्तुविशारद भालचंद्र कुलकर्णी यांचा मंदिर उभारणीत सिंहाचा वाटा
नाशिक (सुयोग जोशी) : अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) आबुधाबीत साकारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराला कुंभनगरीचा हात लागला असून नाशिकचे वास्तुविशारद भालचंद्र कुलकर्णी यांनी मंदिर उभारणीत प्रोजेक्ट डायरेक्टर तसेच लिड आर्किटेक्सट म्हणून सिंहाचा वाटा उचलला. काही दिवसांपूर्वी या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिकरोडच्या उपनगर भागात कुलकर्णी यांचे आई-वडील वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कुलकर्णी दुबईच्या प्रसिद्ध कॅपिटल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी या कंपनीत काम करत आहे. मंदिराचे आर्किटेक्ट डिझाईन, लँडस्केपिंग, इंजिनिअरिंग प्रोजेक्ट, बाहेरील विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही, फायर फायटिंग, बॅक ग्राऊंड म्युझिकसह अनेक तंत्रज्ञानाची कामे कुलकर्णी यांच्या टीमने पूर्ण केली. यासाठी मुख्य आर्किटेक्टच्या समूहातील २५ जणांच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करत हे काम पूर्ण केले. या मंदिराच्या उभारणीसाठी गुलाबी बलुआ दगड वापरण्यात आला. ज्यात बाहेरील ५० अंश तापमानास प्रतिरोध करण्याचे डिझाईन बनविण्यात आले. मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार आहे. भूकंप स्थितीसंदर्भात बांधकाम रचना मान्यता मिळवणे, इलेक्ट्रॉ मेकॅनिकल काम दगडात करण्याचे डिझाइन, मंदिराचे दर्शनी भाग काचेत कामाचे डिझाइन, वादळापासून होणारी हानी साफ करण्यासाठी मेंटेनन्स डिझाईन, नागरिकांना ४० ते ५० अंश तापमानात अनवाणी चालण्यासाठी पदपथ आणि वॉक वे कॉरिडॉर डिझाईन आमच्यासमोर मोठे आव्हान होते. ते आमच्या टीमने लीलया पार पाडल्याचे कुलकर्णी यांनी ‘लाेकमत’शी बोलतांना सांगितले.
चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय मेरिट
लहाणपणापासूनच कुलकर्णी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. नाशिक जिल्ह्यातही कुलकर्णी यांनी सिन्नरचे गारगोटी संग्रहालय, इगतपुरीचे ख्रिश्चन मिशनरी नागरिकांचे रिट्रीट सेंटर असो वा मलकापूरस्थित अनंतराव सराफांची वास्तू कुलकर्णी यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर साकारली आहे. ओझरच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माध्यमिकपर्यंतचे शिक्षण व ज्युनियर कॉलेज ११वी १२वीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. चित्रकलेच्या दोन्ही परीक्षेत ते राष्ट्रीय स्तरावर मेरिटमध्ये आले आहेत.
मला लहाणपणापासून काही तरी वेगळे साकारण्याची आवड आहे. तोच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून मी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. त्यातून गारगोटी संग्रहालय, इगतपुरीचे रिट्रिट सेंटरचे काम केले. दोन वर्षे मंदिराच्या डिझाइनसाठी लागली. २५०० पेक्षा जास्त डिझाइन तयार करण्यात आली, त्यानंतर सध्याचे मंदिराचे डिझाइन फायनल करण्यात आले.
-भालचंद्र कुलकर्णी, प्रोजेक्ट डिझाइनर, बीएपीएस हिंदू मंदिर, दुबई
असे झाले मंदिराचे कामकाज
१) प्रारंभिक बांधकाम कालावधी : ३० महिने
२) सुधारित बांधकाम कालावधी : १६ महिने
३) एकूण मंदिर परिसर : २७ एकर
४) संपूर्ण बांधकाम : ४० हजार क्यूबिक मीटर
५) दगडी काम: ४० हजार क्यूबिक मीटर
६) एकूण मजूर : ५ लाख