पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:43 AM2018-06-28T01:43:55+5:302018-06-28T01:45:44+5:30
नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.

इयत्ता पहिलीच्या बदलेल्या अभ्यासक्रमामुळे शाळांना १५ जूनपूर्वी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होऊ शकला नसल्याने पहिलीच्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळालीच नाही. मात्र शाळा सुरू झाल्यानंतरही पहिलीचे विद्यार्थी अजूनही पुस्तकांपासून वंचित आहेत. पहिलीच्या अभ्यासक्रमाची तीन पुस्तके असून, काही शाळांना एक, तर काही शाळांना दोन पुस्तके मिळाली आहेत. सिडकोतील काही शाळांना तीनही पुस्तकांचा पुरवठा झाल्याचे सांगितले जाते. मात्र शहरातील अन्य भागातील शाळांना अजूनही पुरेसा पुरवठा झाला नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अजूनही वंचित राहिले आहेत.
बालभारतीकडून होणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा महापालिकेच्या भालेकर शाळेतील केंद्रात होतो. येथून मनपा हद्दीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जातो. बालभारतीकडून महापालिका हद्दीतील शाळांनी मागणी केल्यानुसार सुमारे ६ लाख ३७ हजार ८ पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते आठवीच्या वर्गांना सुमारे २८ लाख ६५ हजार ४२२ याप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे.
पाठ्यपुस्तकांप्रमाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या केंद्रामध्ये तर जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये पाठ्यपुस्तके जमा होऊन तेथून ती शाळांना मागणीपत्राप्रमाणे वितरित केली जातात. बालभारतीने दिलेल्या आकडेवारीवरून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. असे असतानाही पहिलीच्या मुलांना मात्र अजूनही पुस्तके मिळाली नसल्याचे मुख्याध्यापकांकडूनच सांगितले जात आहे.